• नॉर्थस्टार सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलतर्फे व्याख्यान
कोल्हापूर • प्रतिनिधी
आहाराच्या वेळा, खाण्यातले पदार्थ यांचे योग्य नियमन करणे सर्वांनाच विशेषतः मधुमेही रुग्णांना फार गरजेचे आहे. जेवण दिवसातून दोन वेळेला घ्या. दोन जेवणांच्या दरम्यान काहीही खाऊ नका. जेवणात शेंगदाणे किंवा ड्रायफूट, अंकुरलेली कडधान्ये (दोन अंडी), सॅलड खाऊन झाल्यावर भात, भाजी, चपाती, भाकरी, चिकन, मटण, मासे असे जेवणातील पदार्थ घ्या व शेवटी दूध पिऊ शकता. औषधांच्या गोळ्या जेवणातूनच घ्या असे आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले.
डॉ. दीक्षित यांनी शरीरात स्त्रावणाऱ्या इन्शुलिन या हार्मोनचा पूर्ण अभ्यास करूनच हा डाएट प्लॅन केला आहे. त्यामुळे टाईप २ डायबेटीस, प्री डायबेटीस अशा लोकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल, म्हणून आहारातून आरोग्य सांभाळण्यासाठी या डाएटचा अवलंब करावा असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी केले.
भारतात लट्ठपणा व त्या अनुषंगाने मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी यांचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या होऊ लागली आहे. त्याचे प्रमाण कसे आटोक्यात आणावे आणि आहारातून आरोग्य कसे सांभाळावे याचे उत्तम मार्गदर्शन प्रसिद्ध आहारतज्ञ व संशोधक तसेच लठ्ठपणा व मधुमेहरहित भारत या अभियानाचे प्रसारक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
कै. डॉ. मा.ना. जोशी फाउंडेशनद्वारा अनेक सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम नॉर्थस्टार सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविले जातात. वाढत्या वजनामुळे गुडघेदुखी, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदी वैद्यकीय समस्या कमी करण्यासाठी व सामाजिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान नॉर्थस्टार हॉस्पिटलचे संस्थापक व अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी आयोजित केले होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे मंगळवारी हे व्याख्यान झाले.
तत्पूर्वी, कै. डॉ. मा.ना. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉ.जगन्नाथ दीक्षित व आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई महिला हॉकी सामन्यात एकमेव भारतीय महिला पंच म्हणून कामगिरी केलेल्या कोल्हापूरच्या हॉकीपटू रमा प्रमोद पोतनीस यांचा सत्कार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.दीपक जोशी, विश्वास जोशी, डॉ दीपक यांच्या मातोश्री श्रीमती जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनिया आजरेकर यांनी केले.
याप्रसंगी डॉ. दीपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वजन आटोक्यात राहिले कि गुडघ्यावरील अतिरिक्त ताण कमी होतो व अधिक कार्यक्षम राहता येते. त्यामुळे गुडघेदुखी व कंबरदुखीच्या अस्थिरुग्णांना दीक्षित डाएटचा नक्की फायदा होईल. तसेच मधुमेही पेशंटमध्ये प्रतिकार क्षमता कमी असल्याने कोणत्याही ऑपरेशन पश्चात जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो, म्हणूनच वेळीच आरोग्याची काळजी घ्या आणि मधुमेह टाळा .
——————————————————-