कोल्हापूर • प्रतिनिधी
जावेद जमादारने नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर निसटता विजय मिळवला. ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-१ने विजय संपादन केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक स्पर्धेत मंगळवारी झालेला दिलबहार आणि फुलेवाडी यांच्यातील सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात ७८व्या मिनिटास जावेद जमादारने गोल नोंदवून संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे चौथ्या फेरीत दिलबहारने एकूण ७ गुणांवर मजल मारली.
तत्पूर्वी दिलबहारच्या महम्मद खुर्शीद, सनी सनगर, जावेद जमादार, सतेज साळोखे, रोहन दाभोळकर यांनी तर फुलेवाडीकडून साहिल पेंढारी, निलेश खापरे, यासिन नदाफ, माणिक पाटील, रोहित मंडलिक यांनी परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या पण दिशाहीन फटके व समन्वयाचा अभाव यामुळे गोल करण्यात अपयश आले.
तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात ऋणमुक्तेश्वरने जुना बुधवार पेठवर २ विरूद्ध १ गोलने विजय मिळवून ३ गुणांची कमाई केली. त्यांचे ९ गुण झाले आहेत. हा सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात ऋणमुक्तेश्वरकडून आदित्य लाडने ४३व्या मिनिटास गोल केला. जुना बुधवारच्या रोहित सुमारे ५३ व्या मिनिटास गोल नोंदवून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तुषार पुनाळकर याने सामन्यातील जादा वेळेत महत्वपूर्ण गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुढील सामने…..
• दि.०९: पोलिस संघ – झुंजार क्लब
पीटीएम (अ) – खंडोबा (अ)
• दि.१०: पीटीएम (ब) – सम्राटनगर स्पोर्टस
शिवाजी – बीजीएम स्पोर्टस