• रविवारी प्रॅक्टीस क्लब विरूद्ध दिलबहार जेतेपदासाठी लढत
कोल्हापूर • प्रतिनिधी
उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या सचिन पाटीलने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळ (अ) ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर मात करून महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी (दि.१३) प्रॅक्टीस फुटबॉल क्लब विरूद्ध दिलबहार (अ) जेतेपदासाठी लढत होईल. ‘फुलेवाडी’चा खेळाडू निलेश खापरे याला आजच्या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आलेले महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू झाले. प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू होत असलेल्या या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांबद्दल फुटबॉल शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सामने विनाप्रेक्षक होणार असल्याने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सामना पाहता येत नसला तरी आज झालेला दिलबहार (अ) – फुलेवाडी सामना अनेकांनी यूट्यूबवर पाहून खेळाचा आनंद लुटला.
दोन वर्षे फुटबॉल स्पर्धा नसल्याने खेळाडू नियमित सरावात नव्हते, याचा प्रत्यय आजच्या सामन्यातील खेळावरून दिसून आला. सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला. फुलेवाडीच्या निलेश खापरे व संकेत वेसनेकर यांनी केलेली खोलवर चढाई दिलबहारचा गोलरक्षक निखिल खाडेने निष्फळ ठरवली. त्यांच्या प्रतिक सावंतने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला आणि गोलची संधी वाया गेली. दिलबहारकडून जावेद जमादार, खुर्शीद, रोमारिक यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी फोल ठरल्या.
उत्तरार्धात दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी प्रयत्न होत होते, पण दिशाहीन फटके व समन्वयाचा अभाव यामुळे चढाया वाया गेल्या. फुलेवाडी संघाच्या तेजस जाधव, निलेश खापरे, संकेत वेसनेकर यांच्या तर दिलबहारकडून रोमारिक, सनी सनगरच्या चाली अयशस्वी ठरल्या. दरम्यान, दिलबहारने राहूल तळेकर याला बदलून सचिन पाटील या अनुभवी खेळाडूस मैदानात उतरवले. त्याचा फायदा झाला. एका चढाईत मोठ्या गोलक्षेत्राबाहेर मिळालेल्या संधीचा सचिन पाटीलने पुरेपूर लाभ उठवला. त्याने जोरदार फटक्यावर मारलेला चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला. ७५ व्या मिनिटास मिळालेल्या या एकमेव गोलची आघाडी राखत दिलबहारने फुलेवाडी संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
आजच्या उपांत्य सामन्यासाठी मुख्य पंच म्हणून संदीप पोवार तर प्रदीप साळोखे, सुमित जाधव व नंदकुमार सुर्यवंशी यांनी सहायक म्हणून काम पाहिले.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर, आमदार चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांना सामन्यापुर्वी श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव व क्रीडा निरिक्षक सचिन पांडव यांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, आदील फरास, अश्कीन आजरेकर आदी उपस्थित होते.
——————————————————-