दिलबहार-शिवाजी शुक्रवारी विजेतेपदासाठी लढत

Spread the love

• दिलबहार – बालगोपाल सामना १-१ गोल बरोबरीत
कोल्हापूर • प्रतिनिधी
      झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत बुधवारी दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम  मंडळ यांच्यातील सामना १-१ गोल बरोबरीत सुटला. सरस गुणांवर (४गुण) दिलबहारने अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी (दि.२९) शिवाजी तरूण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. गुरुवारी दोन प्रदर्शनीय सामने होतील. दरम्यान, आजच्या सामन्यात अभिनव साळोखे सामनावीर ठरला.
        दिलबहार आणि बालगोपाल यांच्यात अंतिम फेरीत प्रवेशासाठी आजचा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघाकडून गोलची आघाडी घेण्याच्या उद्देशाने चढाया झाल्या परंतु पूर्वार्धात संधी वाया गेल्याने गोलफलक कोराच राहिला.
      उत्तरार्धात बालगोलच्या सूरज जाधवने अभिनव साळोखेला पास दिल्यावर अभिनवने गोलपोस्टकडे चेंडू मारला. त्यावर ऋतुराज पाटीलने ताबा मिळवून गोलजाळ्याची दिशा दाखवली आणि संघाला ५२व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारने वेगवान चाली रचल्या. त्यामध्ये सुशांत अतिग्रेने दिलेल्या पासवर पवन माळीने हेडद्वारा गोल नोंदवला. ६४ व्या मिनिटास सामना १-१ असा बरोबरीत आला. तत्पूर्वी, बालगोपालच्या रोहित कुरणे, अभिनव साळोखे, ऋतुराज पाटील यांच्या तर दिलबहारकडून सनी सनगर, स्वयंम साळोखे, महम्मद खुर्शीद यांनी केलेल्या चढाया असफल ठरल्या. अखेर उर्वरित वेळेत १-१ हाच गोलफरक राहून सामना बरोबरीत सुटला. दिलबहारने एकूण ४ गुणांसह अंतिम फेरी गाठली तर बालगोपालचे दोन गुण झाल्याने अंतिम फेरीचे स्वप्न भंगले. 
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!