महापौर चषक स्पर्धेचा ‘दिलबहार’ विजेता तर प्रॅक्टीस क्लब उपविजेता

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     पूर्णवेळेत गोलशून्य राहिलेल्या सामन्यात टायब्रेकरवर दिलबहार तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर ३ विरूद्ध २ अशी मात करून महापौर चषक पटकावला. प्रॅक्टीस क्लबला उपविजेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या दिलबहारला १ लाख ५० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या प्रॅक्टीस क्लबला ७५ हजार रुपये व चषक बक्षीस मिळाले.
     महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टीस क्लब आणि दिलबहार (अ) या तुल्यबळ संघात अंतिम लढत होत असल्याने विजेतेपद कोण पटकावणार, याची उत्सुकता फुटबॉलशौकिनांना लागली होती. छत्रपती शाहू स्टेडियमवर सामना विनाप्रेक्षक असला तरी हजारो फुटबॉलशौकिनांनी “युट्युब’वर पाहिला. तसेच प्रॅक्टीस आणि दिलबहारच्या समर्थकांनी त्या – त्या भागात मोठ्या स्क्रीनवर सामना पाहून खेळाचा आनंद लुटला.
      सामन्याच्या पूर्वार्धात दिलबहारच्या  सुशांत अतिग्रेने दिलेल्या पासवर रोमारिकने गोलची अत्यंत सोपी संधी दवडली तर प्रॅक्टीस क्लबच्या इंद्रजीत चौगुलेचा फटका गोलरक्षक निखिल खाडेने निष्फळ ठरवला. यानंतर दोन्ही संघाकडून चढाया झाल्या परंतु गोलची नोंद झाली नाही. पूर्वार्धात झालेल्या खेळाचीच पुनरावृत्ती उत्तरार्धात झाली. दिलबहारकडून रोमारिक, सुशांत अतिग्रे, सनी सनगर, जावेद जमादार, अनिकेत जाधव यांनी तर प्रॅक्टीस क्लबच्या सागर चिले, इंद्रजीत चौगुले, राहूल पाटील, कैलास पाटील यांनी चढाया केल्या पण त्या अयशस्वी ठरल्या. काही अपवादात्मक खोलवर झालेल्या चढाया वगळता दोन्ही संघांच्या गोलक्षेत्राजवळ चेंडू फक्त फिरत राहिला. दिशाहिन फटके व समन्वयाचा अभाव यामुळे रचलेल्या चाली वाया गेल्या आणि सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
      पूर्णवेळेत बरोबरीत राहिलेल्या सामन्याचा निकाल टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये प्रॅक्टीस क्लबचा गोलरक्षक प्रविण बलबिरसिंगने दोन फटके रोखून महत्वपूर्ण कामगिरी केली पण त्यांच्या तीन खेळाडूंनी मारलेले फटके बाहेर गेल्याने संघाला विजयापासून दूर रहावे लागले. दिलबहारकडून सनी सनगर, प्रमोद पांडे व रोमारिक यांनी अचूक फटक्याद्वारे गोल नोंदवले तर त्यांच्या सचिन पाटील व अनिकेत जाधव यांनी मारलेले फटके प्रॅक्टीसचा गोलरक्षक प्रविण बलबिरसिंगने रोखले. प्रॅक्टीस क्लबच्या जय कामत व राहूल पाटील यांनी अचूक गोल नोंदवले परंतु त्यांच्या प्रतिक बदामे, कैलास पाटील व प्रकाश संकपाळ यांनी मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्ट बाहेर गेले. अशाप्रकारे प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहारने ३ विरूद्ध २ गोलने विजय मिळवून महापौर चषक पटकावला.
      आजच्या अंतिम सामन्यासाठी मुख्य पंच म्हणून प्रदीप साळोखे तर सुनील पोवार, राजेंद्र राऊत व संदीप पोवार यांनी सहायक म्हणून काम पाहिले.
                                बक्षीस समारंभ…..
       स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील,  महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते व पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, आदील फरास, अश्कीन आजरेकर, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव आदी उपस्थित होते.
                                          बक्षिसे…..
• विजेता: दिलबहार – १ लाख ५० हजार रु. 
• उपविजेता: प्रॅक्टीस क्लब – ७५ हजार रु.
• तृतीय व चतुर्थ क्रमांक: बालगोपाल आणि फुलेवाडी संघास ५५ हजार रुपये विभागून.
                                       बेस्ट प्लेअर….. 
• सर्वोत्कृष्ट खेळाडू: पवन माळी (दिलबहार) 
•फॉरवर्ड: रोमारिक (दिलबहार)
•हाफ: रोहन दाभोळकर (दिलबहार)
• डिफेन्स: दिग्विजय वाडेकर (प्रॅक्टीस)
• गोलकिपर: प्रविण बलबिरसिंग (प्रॅक्टीस)
——————————————————-
    
 ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!