केएम चॅम्पियनशिपचे ‘दिलबहार’ला अजिंक्यपद ; ‘शिवाजी’ला उपविजेतेपद 

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोलरक्षक निखिल खाडेने टायब्रेकरवर सलग तीन फटके रोखल्याने दिलबहार तालीम मंडळने शिवाजी तरूण मंडळला नमवून केएम चॅम्पियनशिपचे अजिंक्यपद पटकावले. पूर्णवेळेत सामना १-१ गोल बरोबरीत सुटला होता. अंतिम सामन्याचा मानकरी अर्थातच निखिल खाडे ठरला.
       झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी विजेतेपदासाठी लढत झाली. सामन्याचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, आ.चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक आदींच्या उपस्थितीत झाले. दिलबहार तालीम मंडळ आणि शिवाजी तरूण मंडळ यांच्यातील सामना १-१ गोल बरोबरीत सुटला. दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. दिलबहारकडून राहूल तळेकरने १३ व्या तर शिवाजीच्या करण  चव्हाणने ३५ व्या मिनिटास गोल केले. अखेर  पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
       टायब्रेकरमध्ये दिलहारकडून सनी सनगर, सचिन पाटील, मसूद मुल्ला यांनी अचूक गोल नोंदवले तर महम्मद खुर्शीद याचा फटका गोलरक्षक मयुरेश चौगुले याने रोखला. शिवाजीच्या रोहन आडनाईक, सुयश हांडे, योगेश कदम यांचे फटके गोलरक्षक निखिल खाडेने यशस्वीपणे रोखून दिलबहारच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ‘शिवाजी’ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शिवाजी तरूण मंडळने केएसए चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर केएम चॅम्पियनशिपचे अजिंक्यपद पटकावयाचे स्वप्न भंगले. 
                             बक्षीस समारंभ…..
     केएम चॅम्पियनशिपचा बक्षीस समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. माजी खासदार धनंजय महाडिक, अरूण नरके, प्रा. जयंत पाटील, पो.नि. दत्तात्रय नाळे, सत्यजित उर्फ नाना कदम, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक आदींच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघासह इतरांना चषक देऊन  गौरविण्यात आले.
• विजेता दिलबहार- २ लाख रुपये व चषक
• उपविजेता शिवाजी- १ लाख रु. व चषक
• ३रा क्रमांक: फुलेवाडी- ५० हजार रुपये
• ४था क्रमांक: बालगोपाल- २५ हजार रुपये    
                              उत्कृष्ट खेळाडू…..
• स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान दिलबहारच्या पवन माळी यास मिळाला.
• बेस्ट डिफेन्स: विशाल पाटील (शिवाजी)
• बेस्ट हाफ: जावेद जमादार (दिलबहार)
• बेस्ट फॉरवर्ड: संकेत साळोखे (शिवाजी)
• बेस्ट गोलकिपर: निखिल खाडे (दिलबहार)
       स्पर्धेतील इतर दहा संघांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. 
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!