कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रलंबित असून त्याचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनातील सर्वच घटक अहोरात्र काम करत असून, शासनाचे उत्तमरीतीने सुरु असलेले काम खुपत असल्याने प्रसिद्धीसाठी विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा डाव आखला जात आहे. प्रसिद्धीमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब असून, प्रसारमाध्यमे आणि अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधावा, असे आवाहन करत कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विकासात्मक बाबींबाबत राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याशी चर्चा केली.
राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा करताना कोल्हापूर महानगरपालिकेस नगरोत्थान मधून मंजूर होणाऱ्या रु.१७८ कोटींच्या निधीचा आराखडा तयार करावा. गतवेळच्या महापुराच्या धर्तीवर यावर्षीच्या महापूराच्या पाण्यात बाधित झालेल्या अपार्टमेंटमधील वरच्या मजल्यावरील रहिवासी नागरिकांनाही शासनाने मदत जाहीर केली असून त्यांच्यापर्यंत मदत पोहचवावी. शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. आयटी क्षेत्रात कोल्हापूरला नवी संधी असून, स्थानिक युवकांना नोकरीसाठी बाहेरील शहरात जावे लागते, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आयटी पार्क सारखी संकल्पना राबविण्याचा आराखडा तयार करावा. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा शासनाकडून मंजूर झाला असून, त्याच्या निधीकरिता पाठपुरावा करावा आदी विषयांच्याबाबतीतही चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले उपस्थित होते.
——————————