सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना धनादेशाचे वितरण

Spread the love

• DICGCद्वारे दिलेल्या धनादेशाचे मंत्री राणे यांच्या हस्ते वितरण 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     केंद्र सरकारने सुधारणेचं मोठं पाऊल उचलत बँक ठेव विमा संरक्षण १ लाख रुपयावरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे  यांनी केले.
     ‘ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंत कालनिर्धारित ठेवी विमा भरणा हमी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे  बोलत होते. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभाग तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्र व बॅंक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन सहभाग होत बँकांच्या ठेवीदारांना मार्गदर्शन केले.
     कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना DICGC द्वारे देण्यात आलेल्या रक्कमेच्या धनादेशांचे वितरण केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठेवीदार लाभार्थ्यांशी संवाद साधला.       
      मंत्री श्री. राणे म्हणाले, आयुष्याच्या उत्तरार्धात औषधोपचार आदी कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांसाठी आवश्यक  पुंजी बँकेत ठेव म्हणून ठेवीदारांनी ठेवली. पण यापूर्वी तिला पर्याप्त सुरक्षा नव्हती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेव सुरक्षा विमा योजना अंमलात आणून सामान्य ठेवीदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.
देशातल्या ८० कोटी जनतेला कोरोना काळात अन्नधान्य पुरवठा करून गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचा दुवा केंद्र सरकारने घेतला आहे, असेही ते म्हणाले.
       जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, बँक ठेव विमा संरक्षणाद्वारे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या संरक्षण देण्याबरोबरच सक्षम बनवण्याचं काम केंद्र सरकारने केले आहे.  
    कार्यक्रमाला आमदार प्रकाश आवाडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, माजी खासदार धनंजय महाडिक,  तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आदी बँकांचे  कोल्हापूर क्षेत्रीय प्रमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!