‘निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्ती’चे शिवाजी विद्यापीठात वितरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांना आवश्यक ती मदत करणे, ही शिवाजी विद्यापीठाची ‘बेस्ट प्रॅक्टीस’ ठरावी, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील सौरभ संजय पाटील आणि शिवानी हणमंत गायकवाड या पात्र विद्यार्थ्यांना ‘निवृत्त शिक्षकाची शिष्यवृत्ती सन २०२०-२०२१’चे वितरणप्रसंगी ते आज बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
     कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पदार्थविज्ञान अधिविभागात सन १९६५ ते १९९९ इतका प्रदीर्घ काळ अध्यापन व संशोधनाचे कार्य केल्यानंतर निवृत्त झालेल्या प्रा. बी.व्ही. खासबारदार यांच्यासारख्या समर्पित वृत्तीच्या शिक्षकाने पदार्थविज्ञान अधिविभागात ‘कमवा व शिका’ योजनेतून अभ्यास करून त्याअंतर्गत उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावून एम.एस्सी. भाग-२मध्ये प्रविष्ट झालेल्या पहिल्या दोन विद्यार्थ्यांना ‘निवृत्त शिक्षकाची शिष्यवृत्ती’ देण्यासाठी विद्यापीठाकडे काही निधी दिला. त्यातून सदर शिष्यवृत्ती दरवर्षी प्रदान करण्यात येते. प्रा. खासबारदार यांनी हा एक आदर्श घालून दिला आहे.
     प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि अधिविभाग प्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे यांनी प्रा. खासबारदार यांच्या अध्यापन कौशल्याचा साद्यंत वेध घेतला. डॉ. एन.एल. तरवाळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी सौरभ पाटील व शिवानी गायकवाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
     यावेळी पदव्युत्तर प्रवेश विभागाच्या उपकुलसचिव श्रीमती बी.एम. नाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर.पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी आर. वाय. लिधडे, सहाय्यक कुलसचिव डी.डी. सावगावे आदी उपस्थित होते. वयोज्येष्ठतेमुळे व कोविडबाबत दक्षतेसाठी प्रा. खासबारदार या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!