कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) सलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्यावतीने दिली जाणारी सेवा कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी काम करणारे रेतन सेवक यांना संघाच्यावतीने प्रोत्साहनपर रेतन साहित्याचे वाटप चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते शिरोली दु. येथे वाटप करण्यात आले.
संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत संघाशी सलग्न प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून ४०६ कृत्रिम रेतन सेवाकाद्वारे जिल्ह्यातील सर्व जनावरांसाठी रेतन सेवा पुरवली जाते. यासाठी संघाच्यावतीने नाममात्र किंमतीवर (रु.१५/रेतनमात्रा) गाय, म्हैस विर्यमात्रा पुरवली जाते. सध्या जिल्ह्यातील संघामार्फत दरवर्षी ३ लाख जनावरांना रेतन केले जाते. सदरचे रेतन साहित्य वर्षातून एकदा बॅग, ए.आय. किट (गण,कात्री,फोरसेप,थर्मामीटर व किडनी ट्रे) डिस्पोजेबल हॅन्डग्लोज, संघाचे ओळखपत्र प्रथमउपचारासाठी औषधे व रेनसूट मोफत देण्याचे चेअरमनसो व संचालक मंडळ यांनी निर्णय घेतला होता त्याप्रमाणे त्यांना साहित्य वाटप करण्यात आले. त्याचा लाभ गोकुळच्या सर्व रेतन सेवकांना होणार आहे.
यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, संघाच्या पशुसंवर्धन विभागातील कृत्रिम रेतन सेवा हा मुख्य भाग आहे. तसेच १९७८ पासून संघामार्फत प्रशिक्षण देवून कृत्रिम रेतन सेवा सुरु केली आहे. ४०६ कृत्रिम रेतन सेवक संघासाठी काम करत आहेत. गोकुळचा दूधवाढ कृती कार्यक्रम अंतर्गत २० लाख लिटर दूध संकलन टप्पा पार करण्यासाठी कृत्रिम रेतन सेवक महत्त्वाचा घटक आहे. कृत्रिम रेतन सेवकांनी आपले काम कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण करणे गरजचे आहे. सध्या संघाच्यावतीने लिंगविनिश्चित रेतन मात्रांचे रु १००/- अनुदान देवून प्रती रु ८१/- प्रमाणे वाटपही सुरु केले आहे. ज्यामुळे फक्त मादिवासरे जन्मतात यांचा वापर जास्तीत जास्त करून मादी वासरे संगोपन करावे. तसेच संघाकडे सध्या गायीमध्ये देशी, विदेशी, संकरित जातीच्या वीर्य मात्रा व म्हैस वर्गात मुऱ्हा व पंढरपूर जातीच्या विर्यमात्रा सर्व विभागीय सेंटरकडे उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. यासर्व गोष्टींचा फायदा आपल्या दूध उत्पाकांना त्यांच्या गोठ्यात दूध वाढीसाठी होणार असून त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
यावेळी कृत्रिम रेतन सेवक सुरेश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत डॉ.प्रकाश दळवी व मार्गदर्शन डॉ.यु.व्ही.मोगले यांनी केले.आभार डॉ.किटे यांनी मानले.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील, शिरोली दु.चे डे.सरपंच सचिन पाटील, डॉ. गायकवाड, डॉ.राहुल चौगले, संकलन अधिकारी संभाजी पाटील, भानुदास पाटील, के.वाय.पाटील व संघाचे सुपरवायझर, कृत्रिम रेतन सेवक ,महिला स्वयंसेविका आदी उपस्थित होते.