जिल्हा वार्षिक योजना: २०२२-२३साठी ६४० कोटींच्या आराखड्याला मान्यता

Spread the love


कोल्हापूर • (जि.मा.का.) 
     जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ साठी ६४०.२० कोटींच्या आराखड्याला आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. 
     यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ५२१.९९ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना)११६.६० कोटी तर ओटीएसपी १.६१ कोटीचा समावेश आहे. शासनाने दिलेल्या ४४०.२० कोटींच्या वित्तीय मर्यादेत २०० कोटींची अतिरिक्त मागणी समितीने शासनाकडे केली आहे. सन २०२१-२२साठी ४९३.२१ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी ४९३.२१ कोटी शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २८१.४१ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. डिसेंबर अखेर १२७.२४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावर्षी ७२ कोटी रुपये कोरोना प्रतिबंधक सेवा-सुविधा व उपाययोजनांसाठी खर्च  झाले आहेत. अद्याप निधी खर्च न झालेल्या विभागांचा आढावा घेवून उर्वरित निधी मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
      जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात ऑनलाईन घेण्यात आली. बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जि. प. अध्यक्ष राहुल पाटील, खा. धैर्यशील माने, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, पी.एन. पाटील, राजेश पाटील, राजू आवळे,  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
     आजच्या बैठकीत एक लाखाहून अधिक भाविक भेट देत असलेल्या हातकणंगले तालुक्यातील तासगांव येथील महादेव मंदिर, करवीर तालुक्यातील खेबवडे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर येथील गणेश मंदिर या यात्रा स्थळांना ‘क’ वर्ग मान्यता देण्यात आली.
     बैठकीत जिल्ह्यातील दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव व ज्येष्ठ सामाजिक  कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
     जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी माहिती दिली. सन २०२१-२२ साठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी डिसेंबर अखेर १२७.२४ कोटी रुपये म्हणजेच २५.७९ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी मार्च अखेर खर्च होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
      सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ साठी शासनाने कमाल वित्तीय मर्यादा ३२१.९९ कोटी इतकी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीने २०० कोटींचा अतिरिक्त निधी मागणीस मान्यता देऊन ५२१.९९ कोटींचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यास मंजूरी दिली असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!