दिवाळीचा फराळ यंदा थोडा महागच…

Spread the love


खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
कोल्हापूर • प्रतिनिधी
    गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीचा फराळ महाग आहे. स्वादिष्ट व खमंग फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढले असल्याने दिवाळीचा फराळ महाग झाला आहे. लाडू, चकली, चिवड्यासह सर्व प्रकारचे पदार्थ किलोमागे २० ते ४० रूपयांनी महागले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी असून तयार फराळाच्या पदार्थांना ग्राहकांची मागणी आहे.
     अबालवृध्दांचा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी!अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यंदा दिवाळी सणावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊनच बाजारपेठेत साहित्य खरेदी केले जात आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. फराळाचे साहित्य तसेच तयार फराळ घेण्यासाठी गर्दी  आहे. नमकीन, तिखट – गोड पदार्थांसह मिठाईला विशेष मागणी आहे.
    दिवाळीत विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात आणि त्याची तयारी गृहिणींकडून सुरू आहे. फराळासाठी आवश्यक असलेले तेल, डाळी, साखर आदी कच्च्या मालाचे दर वाढले असल्याने फराळाच्या पदार्थांचे दरही थोडेसे वाढले आहेत.
    फराळाचे पदार्थ प्रतिकिलो दर
स्पेशल चिवडा २८० रूपये, लाल पोहे चिवडा २२० रू., गुलमोहर पोहे चिवडा २८० रू., शेव २२० रू., पापडी २२० रू., खारी बुंदी २२० रू.,भाजणीची चकली २६० रू., बाकरवडी २६० रू., मसाला वडी ३६० रू., बुंदी लाडू (तुपातील) ४४० रू., बुंदी लाडू २२० रू., बेसन लाडू (तुपातील) ३४० रू. बेसन लाडू २२० रू. ,रवा लाडू  २२० रू., रिफाईंड शेंगतेलातील खाजा २४० रू., शंकरपाळी २२० रू., करंजी ३६० रू., अनारसे ४०० रू., बुंदी लाडूची कळी १४० रूपये.
………………………………………………………………………………………………………………………..
             ग्राहकांचा प्रतिसाद
     गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीचा फराळ थोडा महाग झाला आहे. कच्च्या मालाच्या दरातील वाढीमुळे तयार फराळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. किलोला २० ते ४० रूपये इतकी दरवाढ असली तरी ग्राहकांचा स्वादिष्ट, खमंग व खुसखुशीत पदार्थ खरेदीसाठी प्रतिसाद आहे.
                      शरद सांगावकर
              अंबाई फरसाण अँन्ड स्वीटस्

………………………………………………………………………………………………………………………….       

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!