गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Spread the love


   कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये  नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रुग्णांना  मोफत उपचार द्यावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.
     मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचारासंदर्भातील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रुग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो. यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी गरिबांना सहकार्य करून, त्यांची सेवा  करावी, अशा सूचना विधी व न्याय  विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे  यांनी यावेळी केल्या.
      राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये  शासकीय नियमाप्रमाणे १० टक्के गरीब  रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. त्यास दोन मंत्र्यांशिवाय  विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन. लहा, धर्मादाय आयुक्त आर.एन. जोशी, महात्मा फुले जनआरोग्य  योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे  सहसचिव नितीन जिवणे तसेच बॉम्बे, जसलोक, लिलावती, हिरानंदानी, सैफी, बिच कँडी, नानावटी, रहेजा, हिंदुजा, नायर, रिलायन्स, एसआरसीसी, गुरूनानक, मसीना, ग्लोबल, प्रिन्स अली खान, एच. एन. रिलायन्स अशा धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!