मंत्री हसन मुश्रीफ यांचे गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     कडक लॉकडाऊनच्या कालावधीत कोल्हापूरकरांनी गेले आठ दिवस व कागल-गडहिंग्लजकरांनी जे १४ दिवस घरामध्ये बसून मिळवले ते गाफीलपणाने गर्दी करून एक -दोन दिवसांमध्ये घालवू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. श्री. मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला हे आवाहन केले आहे.
       मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले आठ दिवस व कागल गडहिंग्लज तालुक्यामध्ये गेली चौदा दिवस कोरोना साखळी तोडण्याच्या उद्देशाने कडक लॉकडाऊन व  जनताकर्फ्यू पुकारला. नागरिकांनीसुद्धा वाढणारी कोरोना बाधितांची संख्या, कुटुंबेच्या कुटुंबे व्याधिग्रस्त व तरुणांचे होणारे मृत्यू पाहता जे सहकार्य केले, त्याबद्दल नागरिकांचे व प्रशासनाची मनःपूर्वक आभार व धन्यवाद!
     पत्रकात पुढे म्हटले आहे, उद्या सोमवारपासून (दि.२४) राज्याच्या नियमावलीनुसार ३१ मे २०२१ पर्यंत लॉकडाऊन शिथिल होणार आहे. रोज सकाळी सात ते अकरापर्यंत जाहीर करण्यात आलेली आस्थापना म्हणजेच दुकाने, बँका इत्यादी सुरू राहणार आहेत. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, की खरेदीसाठी व दैनंदिन व्यवहारासाठी गर्दी करू नका. झुंबड करू नका. जे घरांमध्ये बसून मिळवले आहे ते एका दिवसात घालवू नका. जर आज खरेदी केली नाही तर पुन्हा आयुष्यामध्ये मला काही मिळणारच नाही, असे समजू नका. दुकाने रोज सुरू राहणार आहेत. सामाजिक अंतर राखा, मास्क वापरा इत्यादी गोष्टीचे पालन करा. पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये ज्या चुका आपण सर्वांनी केल्या त्या पुन्हा केल्या तर गंभीर परिस्थिती उद्भवेल. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका अधिक आहे, असे तज्ञ जाहीर करत आहेत. आपण पुन्हा त्याच चुका केल्या तर ती लहान पिढी आपणास कधीच माफ करणार नाही. सर्व तुम्हाला व्यवस्थित मिळेल, काळजी करू नका. कृपया गर्दी टाळा.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *