• राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर • प्रतिनिधी
शासनाकडून निधी मंजुरीसाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत असताना, निधी मंजूर होवूनही बहुतांश कामे आजतागायत प्रलंबित असल्याचे दिसून येते. चार महिन्यापूर्वी ठेकेदारांना वर्कऑर्डर देवूनही कामास सुरवात केली जात नसेल तर हे महापालिका प्रशासनाचे अपयश असून, अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुभेमुळेच ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण न करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे विकासकामे थांबून त्याचा विपरीत परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. विकासकामांच्या बाबतीत ठेकेदारांची मनमानी खपवून घेवू नका, काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मंजूर योजना, निधी, प्रस्तावित आराखडे, विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
बैठकीच्या सुरवातीस रंकाळा तलावास मंजूर झालेला निधी, नगरोत्थान निधी, कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ प्रस्ताव, प्रभाग रचना, नगरविकास विभागाचा रु.१५ कोटींचा निधी, कावळा नाका येथील एम.एस.आर.डी.सी. जागा, थेट पाईपलाईन योजना, पंचगंगा प्रदूषण, जयप्रभा स्टुडीओ जागा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फुटबॉल थीम पार्क, फुटबॉल आयलँड, के.एम.टी. कर्मचारी प्रश्न, सिद्धार्थनगर पूरसंरक्षक भिंत, पूर नियंत्रण रेषा, ख्रिश्चन समाज दफनभूमी जागा, शहरातील पाणीपुरवठा, नगररचना विभागातील प्रलंबित बांधकाम परवाने आदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी राजेश क्षीरसागर यांनी सुचनाही केल्या.
बैठकीस उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उप -आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक संचालक मस्कर, कनिष्ठ अभियंता हर्षजीत घाटगे, के.एम.टी.चे मंगेश गुरव, वॉर्ड अधिकारी दबडे, घाटगे, एन.एस.पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
—————————————————–