कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे

Spread the love

• आ. ऋतुराज पाटील यांची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
    आ. पाटील यांनी जिल्हाधिकारी  यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशातील बऱ्याच विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सुरु होते. यावर्षी जगातील अमेरिका, इंग्लंड यासारख्या अनेक देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तेथील विद्यापीठांचे ऑफलाईन पध्दतीने शैक्षणिक कामकाज सुरु होणार आहे. कोरोनाच्या सद्याच्या काळामध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच विमानप्रवास तसेच शिक्षणासाठी परदेशात राहण्यासाठी परवानगी दिली जाते. पण कोल्हापूर जिल्ह्यात सद्या प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना लस मिळत नाही. सध्या मुंबई आणि पुणे या शहरामध्ये परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे पाहून लस दिली जात आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची सुविधा अजून सुरु झालेली नाही.
     परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतलेले असते. त्यामुळे जर लसीकरणाअभावी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत तर त्यांना आर्थिक नुकसानी बरोबरच मानसिक त्राससुध्दा सहन करावा लागणार आहे. त्यांच्या शैक्षणिक करिअरलासुध्दा अडथळा निर्माण होणार आहे.
     या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर कोल्हापूरातसुध्दा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केलेली आहे.
———————————————– 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!