वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, जाळू नका: महावितरणचे आवाहन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सध्या उन्हाचा तडाखा सुरु असल्याने शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू किंवा जाळू नका असे आवाहन महावितरणने केले आहे.
      शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व ओला कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सोबतच या यंत्रणेला आग लागण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेला आग लागल्याने किंवा नादुरुस्त झाल्यामुळे वीजपुरवठाही खंडित होण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी वीजयंत्रणेजवळ टाकलेला कचरा पेटवून देण्याचे किंवा त्यामध्ये आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.
      महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कंपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शाॅर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.
      नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात व प्रामुख्याने रोहित्राच्या खाली व फिडर पिलरजवळ ओला व सुका कचरा टाकू नये. तसेच साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या १९१२ किंवा  १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!