प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना महत्त्व देऊ नका: मंत्री मुश्रीफ यांचा कार्यकर्त्यांना संदेश


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, असा संदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
      मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस  दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, मुरगूड शहरवासियांना व माता-भगिनींना पाण्यासाठी दाही दिशा फरपट करायला लावणाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशीच राधानगरी धरणावर जाऊन तेथील पवित्र भूमी कलंकित करू नये, असे पत्रक मुरगुडच्या कार्यकर्त्यांनी काढले होते. मग स्वतःचा स्वार्थ जेथे असेल तेथे चकार शब्दही बोलत नाहीत.
      पत्रकात पुढे म्हटले आहे, कोल्हापूर जिल्हा कोरोना परिस्थितीमध्ये चौथ्या लेव्हलवर असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे परवानगी मागितली तरी शासकीय अधिकारी परवानगी देणारच नाहीत. अशी परवानगी दिली तर त्यांच्या नोकऱ्या जातील, हे माहीत असल्यामुळे मुद्दाम परवानगी मागायची. परवानगी मिळणार नाही, हे माहित असल्यामुळे स्टंटबाजी करायची. त्यानंतर ही परवानगी कोणाच्यातरी सांगण्यावरून दिली नाही, अशीच सहानुभूती मिळवायची. त्यातून प्रसिद्धी मिळवायची, अशा बालिश बुद्धीच्या सल्लागारांचा सल्ला ऐकून अशी कृती करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. बेशक धरणावर जाऊन मुक्काम करू देत, त्याची काळजी करू नका.
      पत्रकात पुढे म्हटले आहे, परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. या काळामध्ये आपण जनतेची सेवा करू. त्यांच्या संकटामध्ये धावून जवून त्यांना दिलासा देऊया. कोरोना काळामध्ये  जनतेच्या सुख- दुःखामध्ये सामील होऊया. विकासकामे करण्याची तर अशी संधी सुवर्णसंधी आली आहे, की गावागावातील विकासकामे अशी करूया की जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल. परमेश्वराने आपल्याला एवढ्या मोठ्या यशोशिखरावर पोहोचवले आहे की अतिशय विनयाने जनतेला विश्वास देऊया. जनतेने नाकारलेल्यांना दुसरे कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळेच, उथळपणाने बालिश व अपरिपक्व कृती केल्या जात आहेत. ही सगळी कृती प्रसिद्धीसाठी असून तिकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपला वेळ वाया घालवू नका.
                  जनता फार हुशार आहे…..
     मुरगूडच्या कार्यकर्त्यांनी राधानगरीच्या धरणावर गोमूत्र शिंपडून ती भूमी पवित्र करणार असल्याचा इशारा पथकाद्वारे दिलेला आहे. याचा संदर्भ घेत मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, राधानगरी धरणावर गोमूत्र वगैरे शिंपडणे असल्या गोष्टी करून त्यांना प्रसिद्धीसाठी वाव देऊ नका. जे कोणी असा प्रकार करतील, ते माझे कार्यकर्ते असणार नाहीत, असा दमही श्री. मुश्रीफ यांनी दिला आहे. जनता सर्व ओळखून असते. जनता फार हुशार आहे, म्हणूनच २५ वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यांचा आदर करूया.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *