सरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भाजपाची मागणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जात आहे. यासंदर्भात बुधवारी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले.
      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतानाही महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेल्या रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय ? उष्मा वाढत असताना सर्वसामान्य नागरीक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकातील असंतोष वाढत चालला आहे.
     प्रास्ताविक करताना सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कोल्हापूर शहरातील छोटे व्यवसायीक, फेरीवाले यांची व्यवसायाबद्दल असलेली भूमिका स्पष्ट केली.
     देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, लॉकडाऊननंतर सर्वसामान्य नागरीक, छोटे व्यापारी, फेरीवाले, छोटे-मोठे उद्योग धंदे पुन्हा एकदा उभारी घेत असताना लॉकडाऊनचा आततायीपणाचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना काय साध्य करायचे आहे ? तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संकट वाढत असताना तेथे कडक निर्बंध लावण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यालाच लॉकडाऊनचे चटके सोसण्याचे महापाप मुख्यमंत्री का करत आहेत हेदेखील उमजत नाही. एकीकडे मद्याची दुकाने रात्री १० पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देणाऱ्या प्रशासनाने सर्वसामान्यांची उपजीविका चालणाऱ्या व्यवसायांवरच का कुऱ्हाड चालवली आहे, असा सवाल उपस्थित केला. गोरगरीब जनतेचा विसर पडलेल्या जनतेचा विचार न करता राज्याने पुन्हा लॉकडाऊन केल्यास समाजातील सर्व घटकांना पॅकेज जाहीर करावी अशी मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर थर्मल चेकिंग, रॅपीड टेस्ट आदी आवश्यक गोष्टींचे प्रयोजन करण्यात यावे असे सांगितले.
     भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीदेखील राज्य सरकारच्या मनात असणाऱ्या लॉकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रसातळाला नेणाऱ्या या निर्णयाला भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले. फेरीवाले, छोटे व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक यांना महापालिका व पोलीस प्रशासन आपले व्यवसाय ८ वाजताच बंद करण्यास भाग पाडत आहेत. परंतु या व्यवसायिकांची व्यवसायाची वेळ ही सायंकाळी ७ नंतर सुरु होत असल्याने प्रशासनाने अशा व्यवसायिकांना रात्री १० पर्यंत आपला व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेच लॉकडाऊनचा असा चुकीचा निर्णय घेऊन समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्यास व त्यातून कायदा व सुव्यवथा बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाची असेल असे सांगितले.
      शिष्टमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, निवेदनाची दखल घेऊन पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासक यांना तात्काळ सूचना देऊन प्रशासनाच्यावतीने रात्री ८ च्या बंदसाठी होणाऱ्या कारवाईवर विचार करून व्यवसायाची वेळ १० पर्यंत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
     याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विक्रम राठोड, उद्योग आघाडी अध्यक्ष कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, महिला अध्यक्षा गायत्री राऊत, अप्पा लाड, किरण तासगावे, गिरीष साळोखे, प्रवीणसिंह शिंदे, अक्षय निरोखेकर, गिरीश अणवेकर, पौरस बिवते, सुश्नात वराळे, रोहन चव्हाण, राजू राठोड, प्रथमेश मिठारी, अप्पा साळोखे, संग्राम साठम, सुरज खटावकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————–

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!