गडहिंग्लज अर्बनच्या ठेवीदारांनी चिंता करू नये: मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गडहिंग्लज अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी कोणतीही आणि कसलीही चिंता करू नये, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आपण या बँकेच्या मागे हिमालयसारखा उभा आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
      प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे, सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बँकेमध्ये मार्च २०२० साली गुंतवणूक समितीची मान्यता न घेताच बँकेच्या जनरल मॅनेजरने १३ कोटी रुपये फंडामध्ये गुंतवणूक न करता ब्रोकरच्या वैयक्तिक फार्मकडे वर्ग केले. यापूर्वी अनेक दिवसापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जात होती. संबंधित ब्रोकरनी चांगला परतावाही दिल्याने विश्वास निर्माण केला होता. परंतु यावेळी त्यांनी दुसऱ्या अकाऊंटवर ब्रोकर व जनरल मॅनेजर दोघांच्या संगनमताने पैसे वर्ग केले गेले आणि त्यामुळे १३ कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. मूळात गडहिंग्लज अर्बन बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने १३ कोटी रूपयांच्या अपहाराचा कोणताही परिणाम होणार नाही.
     यामुळे बँकेच्या ठेवीदारांनी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. आपली सर्व रक्कम बँकेत सुरक्षित आहे. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून या बँकेच्या मागे ठामपणाने उभा आहे. कोणतीही कारवाई त्यामुळे होणार नाही. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. संचालक मंडळाचा या प्रकाराशी कोणताही संबंध नाही, असे मला पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेल आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी संबंधित दोघांनाही लवकरच अटक करून व त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे अभिवचन मला दिलेले आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नये. आपण कोणत्याही परिस्थितीत अपहाराची पैसे तर परत मिळवूच. त्याचबरोबर बँक आतापेक्षा अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठीही प्रयत्न करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!