संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.अरुण पाटील


कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलुगुरूपदी नुकतीच डॉ.अरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे दुसरे कुलगुरु म्हणून त्यांना हा मान मिळाला आहे.
      डॉ.अरुण पाटील हे कागल तालुक्यातील कुरुकली गावचे. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल तालुक्यातून पूर्ण केले. नंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून एमएस्सी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथे १० वर्षाहून अधिककाळ अध्यापनाचे कार्य केले. दरम्यानच्या काळात युनेस्कोने त्यांना पीएच डी साठी स्कॉलरशिप प्रदान केली व याच स्कॉलरशिपच्या आधारे त्यांनी ऑस्ट्रेलियातील नामवंत मेलबर्न येथील मोनॅश विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी शिक्षण नेमक्या कोणत्या पद्धतीने शिकवावे तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण पद्धतीतील बदल हा त्यांचा पीएच डी चा मुख्य विषय होता.
      डॉ.अरुण पाटील यांना शिक्षण क्षेत्रात ३१ वर्षाहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. डॉ. पाटील हे उत्कृष्ट संशोधक आहेत. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रोजेक्ट अँड डिझाईन बेस्ड शिक्षण पद्धती अधिक प्रभावशाली असल्याचे त्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. तसेच प्रात्यक्षिकातून शिक्षण ही शिक्षण पद्धती अंमलात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. डॉ पाटील यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सेंट्रल क्वीन्सलँड विद्यापीठाचे उपाधिष्ठाता म्हणून काहीकाळ काम पाहिले आहे. तसेच पुढे ते ऑस्ट्रेलियातीलच डेकिन या नामवंत विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचे विभागप्रमुख होते. यानंतर त्यांनी राजस्थानमधील अमिटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी काहीकाळ काम केले. कुलगुरू म्हणून त्यांनी तेथे उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी केलेल्या कार्याची दाखल घेऊन एआयएम अवॉर्ड्स इंडिया यांच्याकडून ”अभिनव कुलगुरू” म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकंदरीतच कोल्हापूरच्या या भूमिपुत्राने सातासमुद्रापार आपला नावलौकिक मिळविला आहे.
     डॉ. पाटील यांनी ऑस्ट्रेलियामध्ये ‘टेक्सा’ या नामवंत मानांकन व गुणवत्ता दर्जा देणाऱ्या संस्थेसाठी अभियांत्रिकीमधील तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत व त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. यामध्ये त्यांनी स्प्रिंजरसारख्या नामवंत प्रकाशनामार्फत “अभियांत्रिकी शैक्षणिक गुणवत्ता हमी: एक जागतिक दृष्टीकोन” या विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला संपूर्ण जगभरातून मागणी आहे.
     डॉ. पाटील यांच्या असंख्य संशोधन प्रकल्पांना ऑस्ट्रेलियन, मलेशियन, रशियन आणि व्हिएतनाम देशांमधून  अनुदान मिळाले आहे. ते इंजिनीअर्स ऑस्ट्रेलिया (ईए), युरोपियन सोसायटी फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन (एसईएफआय), ऑस्ट्रेलियन कोलॅबोरेटीव्ह  एज्युकेशन नेटवर्क (एसीईएन) आणि ऑस्ट्रेलियन असोसिएशन फॉर इंजिनियरिंग एज्युकेशन (एएईई) यासह अनेक व्यावसायिक संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याची दखल घेऊन आजवर नामवंत संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. तसेच त्यांच्या शोध निबंधांमधील नोंद जागतिक स्तरावर घेतली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था व विद्यापीठाशी शैक्षणिक व संशोधन करार करून शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
        विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब…..
      संजय घोडावत विद्यापीठाला सर्वोतोपरी अव्वल बनविण्यासाठी डॉ.अरुण पाटील यांच्यासारखी कार्यतत्पर व्यक्ती आमच्या विद्यापीठास कुलगुरू म्हणून लाभली ही विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब आहे असे उदगार संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी काढले.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *