भारती विद्यापीठाचे डॉ.दादा नाडे “रिसर्च एक्सलंस” पुरस्काराने सन्मानित


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आयसी कनेक्ट अँड झ्युकिनी या संस्थेकडून भारती विद्यापीठाच्या  डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रा.डॉ.दादा पांडुरंग नाडे यांना ”रिसर्च एक्सलंस” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. वातावरणीय ओझोनवरील संशोधनामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
     डॉ. दादा नाडे हे अवकाश वैज्ञानिक म्हणून सर्वाना परिचयाचे आहेत. अवकाश क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना या आधी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
अवकाश वैज्ञानिक डॉ. नाडे हे वातावरणातील आयनांबर व ओझोनच्या थरावर होणाऱ्या परिणामाचे संशोधन करीत आहेत. या विषयावर त्यांचे ३२ हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकेतून प्रसिद्ध झाले असून त्यांनी ६० हुन अधिक परिषदेमध्ये आपले संशोधन सादर केले आहे. खगोलीय विज्ञान क्षेत्रातील संशोधन चीन देशातील हैफेई या शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहचलेले डॉ.नाडे यांचे संशोधन क्षेत्रातील कार्य हे भारती विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे.  
     समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संशोधन कार्य पोहचविण्यासाठी डॉ.दादा नाडे हे मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, ओझोन व पर्यावरण, अवकाश संशोधन, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या विषयावर आजवर ११० हुन अधिक व्याख्याने देऊन लोकांमध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती करण्याचे काम करत आहेत. समाजपयोगी विज्ञान लोकांपर्यंत पोहचावे यासाठी ते सतत ओझोन, हवामान अंदाज, अवकाश विज्ञान अशा विविध विषयावर वर्तमानपत्रात लेखन करतात.
     डॉ.दादा नाडे यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातील कार्याबरोबर, शैक्षणिक, सामाजिक,विज्ञान, संशोधन व पर्यावरण क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेऊन युरोप खंडातील बेल्जीयम देशाच्या युनिअन रेडिओ सायंटिफिक इंटरनॅशनल संस्थेने त्यांना आजीव सदस्यपद बहाल केले आहे. तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका व नासा यांनी त्यांना समाजउपयोगी संशोधनासाठी स्पेस वेदर मॉनिटर प्रदान केला आहे. त्यांनी भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था, पुणे यांच्याशी सामंजस्य करून भारतीय हवामान खात्याच्या उपकेंद्राची संजय घोडावत विद्यापीठात स्थापना केली आहे. 
     डॉ.दादा नाडे यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्राप्त झालेबद्दल भारती विद्यापीठ प्र-कुलगुरू, कार्यवाह व राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम, कुलगुरु डाॅ. माणिकराव साळुंखे, विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
——————————————————-
 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *