कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. देशभरात कोल्हापूरच्या व्यक्तिमत्वाची ओळख दिलदार, दिलखुलास, रांगड व्यक्तिमत्व अशी आहे. देशभक्ती, मदतकार्य अशा जिव्हाळ्याच्या सर्वच गोष्टीत कोल्हापूर हे पुरेपूर आणि भरपूर देण्यात प्रसिद्ध आहे. नुकतीच १५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील प्रसिद्ध युरोओलॉजिस्ट डॉ.प्रकाश गुणे आणि कुटुंबियांनी भारतीय सेनादलाला तब्बल १ कोटी रूपयांची देणगी नवी दिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे धनादेशाच्या रूपाने सुपूर्त केली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज डॉ.प्रकाश गुणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. त्याचबरोबर अभिमान कोल्हापूरचा हे स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रकाश गुणे यांच्या दातृत्वाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले. आपल्यासारख्या व्यक्तींमुळेच कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उभयतांनी विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व डॉ.राहूल गुणे यांची उपस्थिती होती.