कोल्हापूर• प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांना व्हीडीजीओडी प्रोफेशनल असोसिएशनमार्फत “उत्कृष्ट वैज्ञानिक” या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या संस्थेमार्फत अभियांत्रिकी, विज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रातून दरवर्षी जगभरातून वैज्ञानिकांची निवड विविध संशोधन निकष लावून करण्यात येते. यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मागील आठवड्यात डॉ. मोहोळकर यांना एल्सविअर स्कोपसने घेतलेल्या सर्वेक्षणात फोटोकॅटलायसिस, सौरघट संशोधनात आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करताना जागतिक क्रमवारीत ३१२ वे स्थान मिळाले आहे. डॉ. मोहोळकर यांना त्यांच्या संशोधनातील अतुलनीय कामगिरीबद्दल नुकताच इंटरनॅशनल रिसर्च अवॉर्ड ऑन सायन्स, हेल्थ अँड इंजिनीरिंग अर्थातच सायन्स फादर या संस्थेकडून ”आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स ” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना या आधी गतवर्षी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. तसेच यावर्षी एडी सायंटिफिक या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात देखील ते जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. तसेच त्यांना व्हिनस इंटरनॅशनल या संस्थेमार्फत यावर्षीचा ”मटेरियल सायन्स विशेषतज्ज्ञ” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दाखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. डॉ. मोहोळकर हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेट साठी परदेशी पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.