डॉ.नरेश गिते महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

Spread the love


मुंबई :
     महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि.१३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
      राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये ३८ वर्षांचा प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. नरेश गिते यांनी १९८३ मध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सन २००९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवामध्ये (आयएएस) डॉ. गिते यांची निवड झाली. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक आदी पदांवर डॉ. गिते यांनी काम केले आहे.
      तसेच महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. नरेश गिते यांनी सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा तसेच थेट गावात जाऊन वीजप्रश्न सोडविण्यावर भर दिला. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०च्या अंमलबजावणीची विशेष जबाबदारी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून डॉ. गिते यांच्याकडे देण्यात आली होती. यामध्ये ४५ दिवसांच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या माध्यमातून ही योजना गावोगावी पोहोचविण्यात त्यांनी योगदान दिले. गेल्या वर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी थेट भरती प्रक्रियेतून डॉ. गिते यांची नुकतीच निवड झाली.
      राज्यातील २ कोटी ८० लाख वीजग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणचे अंतर्गत मानव संसाधनाचे प्रशासकीय कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणखी वेगवान तसेच तत्पर व सकारात्मक करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!