सर्वोत्कृष्टतेचा ध्यास असलेले डॉ.संजय पाटील

Spread the love


  कोल्हापूर • सुरेश आंबुसकर
       “जे करायचे ते सर्वोत्तम” या ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे डॉ. संजय डी. पाटील हे जिद्द, ध्येय व चिकाटीला प्रचंड मेहनतीची जोड देत शिक्षण, व्यवसाय, उद्योग, शेती क्षेत्रात नवंनवे प्रयोग करत यशोशिखरावर पोहोचलेले आहेत. डॉ. संजय पाटील यांचा १८ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने…..
      एखादी गोष्ट मनावर घेतली की त्याचा सर्व अंगांनी अभ्यास करायचा, झपाटून कामाला लागायचे आणि “जे करायचे ते सर्वोत्कृष्ट” हा ध्यास घेत डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी वैद्यकीय व तंत्रशिक्षण, शेती, रिटेल, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे.
      डी. वाय. पाटील शिक्षण संस्था असो किंवा हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, हॉटेल सयाजी असो. या प्रत्येक ठिकाणी डॉ. संजय डी. पाटील यांच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौशल्य अनुभवायला मिळते. जिद्द, ध्येय व चिकाटीला प्रचंड मेहनतीची जोड देत त्यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे. १९८४ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील यांनी कसबा बावडा येथे डी. वाय. पाटील ग्रुपच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्याचे नेतृत्व डॉ. संजय पाटील यांच्याकडे सोपविले. उत्तम नेतृत्व कौशल्य व दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी ग्रुपचा विस्तार केला. त्यांना सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्राची आवड आहे. त्यामुळे शेतीतही विविध प्रयोग त्यांनी राबविले. तळसंदे येथे २०५ एकर शेतीची खरेदी केली. त्यावेळी डोंगराळ, मुरबाड असलेल्या या जमिनीवर डॉ. संजय पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सारा परिसर हिरवाईने नटून गेला. कृषीविषयक अद्ययावत ज्ञान, नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी १९९१ ला याठिकाणी कृषीविज्ञान केंद्राची स्थापना केली आणि नुकतेच येथे डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्थापन झाले आहे.
       हॉटेल सयाजीच्या उभारणीतही त्यांनी सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून नियोजन केले आणि कोल्हापूर शहरात पंचतारांकित हॉटेल उभारले. शिक्षण संस्था, कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, हॉटेल सयाजी ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत, पण प्रत्येक गोष्टीत त्यांनी परंपरा आणि नव्याचा संगम साधून जे काही केले, ते सर्वोत्कृष्ट ठरले आहे. एक माणूस विविध क्षेत्रात किती भव्य कामे उभी करू शकतो याचे ते एक आदर्श उदाहरण आहेत.
      डॉ. संजय डी. पाटील हे डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी आणि डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी पुणे आणि  डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे कोल्हापूर या संस्थांचे कुलपती आहेत.                         
                                       पुरस्कार…..
      डॉ. संजय डी. पाटील यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना वनश्री पुरस्कार, कोल्हापूर भूषण, राष्ट्रीय शिक्षण सन्मान, कृषीनिष्ठ पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड, विद्याभारती अवॉर्ड, कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड, राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार, नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड, भारत गौरव अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!