दलाई लामा फेलोशीपसाठी डॉ. सुबोध प्रभू यांची निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागात अॅडजंक्ट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ. सुबोध (शिवदत्त) प्रभू यांची प्रतिष्ठेच्या ‘दि दलाई लामा फेलो’ म्हणून निवड झाली आहे.
     ‘न्यूरोलॉजिकल को-रिलेट्स ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी’ या विषयावरील शास्त्रीय शोधप्रबंध ते वर्षभरात सादर करतील. त्याचप्रमाणे या विषयावर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ व तत्वज्ञांच्या समूहासमोर दोन सेमिनारही देतील.
      डॉ. प्रभू यांना प्राप्त झालेल्या या फेलोशीपबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
      बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या रक्कमेतून दरवर्षी आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी एका संशोधकाची फेलो म्हणून निवड केली जाते. यासाठी जगभरातून प्रस्ताव सादर करण्यात येत असतात.
      कोल्हापुरातील ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांचे सहकारी म्हणून दशकाहून अधिक काळ  रुग्णसेवा केल्यानंतर डॉ. सुबोध प्रभू यांनी फ्रान्समध्ये ग्रेनोबल येथे औषधांना दाद न देणाऱ्या आणि मेंदू शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या फिट्स यांवर डी.बी.एस. या नाविन्यपूर्ण उपचार पद्धतीबाबत सहा वर्षे संशोधन केले. यासाठी त्यांना फेडरेशन ऑफ युरोपियन न्यूरो सायन्स सोसायटीज् (फॅन्स) यांची वैयक्तिक ग्रँट मिळाली होती.
       भारतात परतल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी ‘बिहेविअरल इकॉनॉमिक्स’ विषयाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम सुरू केले. तसेच फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनोबल येथील ब्रेनटेक संस्थेत ‘ट्रान्सलेशनल थेरपीज्’ विषयातील संशोधक विद्यार्थ्यांचे सह-मार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!