घोडावत विद्यापीठाच्या डॉ.उत्तम जाधव यांचे सेट परीक्षेत यश


कोल्हापूर • प्रतिनिधी
    संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टस् अधिविभागाचे डीन डॉ. उत्तम पांडुरंग जाधव यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डिसेंबर २०२० राज्य पात्रता (सेट) परीक्षेत उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे.  डॉ. जाधव यांचे यश म्हणजे संजय घोडावत विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीतील आणखी एक मानाचा तुरा आहे.
    दरम्यान, डॉ.उत्तम जाधव यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.एम. टी. तेलसंग, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला.
    डॉ.जाधव यांचे प्राथमिक, माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण पंढरपूर याठिकाणी झाले. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. पुढे लगेचच शिवाजी विद्यापीठात पी.एचडीसाठी प्रवेश घेऊन २०१३ साली सध्याच्या इंग्रजी अधिविभागाच्या विभागप्रमुख डॉ.तृप्ती करेकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ”भारतीय इंग्रजी नाटकातील पुरुषत्वाच्या संकल्पनेची संरचना” या विषयावर पी.एच डी. पदवी मिळविली. दरम्यानच्या काळात त्यांना बीबीसी लंडन या जगप्रसिद्ध संस्थेबरोबर ट्रान्सलेटर (अनुवादक) म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
    डॉ.जाधव हे संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये २०१३ सालापासून कार्यरत असून त्यांनी २०१७ साली संजय घोडावत इन्स्टिटयूटचे संजय घोडावत विद्यापीठात रूपांतर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे डीन म्हणून त्यांनी विद्यार्थीभिमुख संवेदनशील प्रशासनाचा ठसा उमटविला आहे. स्कूल ऑफ लिबरल आर्टस् या अधिविभागांतर्गत जर्नालिजम आणि मास कम्युनिकेशन विभाग, इंग्रजी भाषा विभाग, जर्मन भाषा विभाग त्यांनी सुरु केले असून या विभागांतर्गत विविध अभ्यासक्रम राबविले जातात. पुढील वर्षांपासून अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, भाषांतर, संगीत, नाट्यकला, ललितकला, वोकेशनल कोर्सेस इत्यादी विभाग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
      डॉ.जाधव हे माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर या विषयातील आय.आय. टी. मुंबई प्रशिक्षित तज्ज्ञ असून या विषयावर त्यांनी आजवर अनेक कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्राध्यापकांना प्रशिक्षित केले आहे. त्यांनी आय. आय. टी. मुंबईने घेतलेल्या ” मेंटरींग एज्युकेटर्स इन एज्युकेशन टेकनॉलॉजी ” या कार्यशाळेत विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १० तर आंतरराष्ट्रीय परिषदेत ५ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. ते इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन असोसिएशन फॉर कॉमनवेल्थ लिटरेचर अँड लँग्वेज या संस्थांचे सदस्य आहेत.
डॉ. जाधव यांनी  ”राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व त्याची अंमलबजावणी” या विषयावर  तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. सध्या ते घोडावत विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०-अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *