डॉ. विनायक पारळे यांना नामांकित जागतिक शास्त्रज्ञ म्हणून बहुमान


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूरचे सुपुत्र व सध्या दक्षिण कोरियाच्या योन्सई विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर या पदावरती कार्यरत असणारे डॉ. विनायक पारळे यांना जागतिक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
      एडी सायंटिफिक इंडेक्स या संस्थेमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. या संस्थेमार्फत जगातील नामांकित शास्त्रज्ञांची क्रमवारी गुगल स्कॉलरचा आधार घेऊन दरवर्षी जाहीर केली जाते. यामध्ये संशोधनसंबंधी विविध निकषाच्या आधारे ही क्रमवारी प्रसिद्ध केली जाते. गेल्याच महिन्यात डॉ. विनायक पारळे यांना सायन्स फादर या प्रतिष्ठित संस्थेकडून “युवा शास्त्रज्ञ” पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
      डॉ.विनायक पारळे हे सध्या दक्षिण कोरियामधील नामवंत योन्सई विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत. डॉ. पारळे यांनी संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. ते सध्या ऐरोजेल या आव्हानात्मक पदार्थावर पुढील संशोधन करीत असून त्यांचे मार्गदर्शक डॉ.एच.एच पार्क व टीमला पुढील संशोधनासाठी कोरियन गव्हर्नमेंटकडून १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरियामध्ये पहिले ऐरोजेल मटेरियल रिसर्च सेंटर उभारले आहे. डॉ.पारळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. वर्षा पारळे हे या रिसर्च सेंटरचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.  
     डॉ.पारळे हे १० वर्षाहून अधिक काळ संशोधन क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी ऐरोजेल व्यतिरिक्त सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग इत्यादी क्षेत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. याचबरोबर ऐरोजेल पदार्थाचा ड्रग डिलिव्हरीसाठी उपयोजनात्मक अभ्यास याविषयावर सुद्धा त्यांचे पुढील संशोधन युद्धपातळीवर चालू आहे. त्यांनी आतापर्यंत ६० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जगभरातील अनेक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधासाठी घेतला आहे.
      डॉ. पारळे यांचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण मडिलगे (ता.भुदरगड) येथे झाले. तसेच त्यांनी पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे त्यांनी संजय घोडावत इन्स्टिटयूट, आर आय टी इत्यादी नामवंत संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य केले. २०१६ साली ते पुढे पोस्ट डॉक्टरेटसाठी दक्षिण कोरिया मध्ये योन्सई विद्यापीठात प्रा. एच एच पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली रुजू झाले. सध्या ते तेथे रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत.  
      डॉ.पारळे हे अमेरिकन केमिकल सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, एल्सवेअर, स्प्रिंजर, विले, आयओपी अशा ५० हुन अधिक नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. ते सध्या एमडीपीआयच्या नामवंत पॉलीमर्स या जर्नल्सचे एडिटर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये तज्ञ म्हणून आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर १०० हुन अधिक कार्यशाळा, प्रशिक्षणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र यामध्ये सहभाग दर्शविला आहे.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *