डॉ. विनायक पारळे ”युवा शास्त्रज्ञ” पुरस्काराने सन्मानित

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सायन्स फादर या प्रतिष्ठित संस्थेकडून कोल्हापूरचे भूमिपुत्र वैज्ञानिक डॉ. विनायक गणपती पारळे यांना ”युवा शास्त्रज्ञ” पुरस्काराने गौरवण्यात आले. सायन्स फादर ही संस्था दरवर्षी विज्ञान शाखेत उत्तम कामगिरी बजावलेल्या नामवंत वैज्ञानिकांचा सन्मान करते. डॉ. विनायक पारळे यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
     डॉ. विनायक पारळे हे सध्या दक्षिण कोरियामधील नामवंत योन्सई विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत. डॉ. पारळे यांनी संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. ते सध्या ऐरोजेल या आव्हानात्मक पदार्थावर पुढील संशोधन करीत असून त्यांचे मार्गदर्शक डॉ. एच. एच. पार्क व टीमला पुढील संशोधनासाठी कोरियन गव्हर्नमेंटकडून १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरियामध्ये पहिले ऐरोजेल मटेरियल रिसर्च सेंटर उभारले आहे. डॉ. पारळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. वर्षा पारळे हे या रिसर्च सेंटरचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.  
     डॉ. पारळे हे १० वर्षाहून अधिक काळ संशोधन क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी ऐरोजेल व्यतिरिक्त सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग इत्यादी क्षेत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. याचबरोबर ऐरोजेल पदार्थाचा ड्रग डिलिव्हरीसाठी उपयोजनात्मक अभ्यास या विषयावरसुद्धा त्यांचे पुढील संशोधन युद्धपातळीवर चालू आहे. त्यांनी आतापर्यंत ६० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जगभरातील अनेक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधासाठी घेतला आहे.
     डॉ. पारळे यांचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण मडिलगे (ता.भुदरगड) येथे झाले. तसेच त्यांनी पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे त्यांनी संजय घोडावत इन्स्टिटयूट, आर. आय. टी. इत्यादी नामवंत संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य केले. २०१६ साली ते पुढे पोस्ट डॉक्टरेटसाठी दक्षिण कोरियामध्ये योन्सई विद्यापीठात प्रा. एच. एच. पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली रुजू झाले. सध्या ते तेथे रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत. प्रा.पारळे यांचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर पण प्रेरणादायी असा राहिला आहे. डॉ. पारळे हे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यास तत्पर असतात. सामाजिक उपक्रमातदेखील ते सक्रिय असतात. मग ते महापूर असो वा कोरोना अशा कठीण समयी त्यांनी परदेशातून मुख्यमंत्री सहाय्यता फंडात मदत करून आपले उत्तरदायित्व दाखविले होते. परदेशात राहून त्यांनी तेथे मराठा मंडळ स्थापित करून यामार्फत भारतीय सण साजरे करत संस्कृती जपली आहे.  
ते अमेरिकन केमिकल सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, एल्सवेअर, स्प्रिंजर, विले, आयओपी अशा ५० हुन अधिक नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यापैकी अनेक जर्नल्सनी त्यांना उत्कृष्ट रिव्युव्हर म्हणून गौरविले आहे. डॉ.पारळे हे सध्या एमडीपीआयच्या नामवंत पॉलीमर्स या जर्नल्सचे एडिटर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये तज्ञ म्हणून आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर १०० हुन अधिक कार्यशाळा, प्रशिक्षणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र यामध्ये सहभाग दर्शविला आहे.
       पुरस्काराने जबाबदारी वाढली…….
     या पुरस्काराबाबत बोलताना डॉ. विनायक पारळे म्हणाले की, ”भविष्यामध्ये ऐरोजेल पदार्थ हा प्लॅस्टिकला पर्याय असणार आहे. ऐरोजेलच्या विघटनावर देखील आम्ही काम करीत आहोत. ऐरोजेल हा पदार्थ प्लॅस्टिकपेक्षा कमी प्रदूषण करतो तसेच वजनाने अतिशय हलका व लवचिक आहे म्हणून हा पदार्थ बाजारात आणणे व त्याचा यशस्वी वापर करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मूलभूत संशोधनाकडे वाटचाल करून आपल्या संशोधनाचा समाजासाठी कसा फायदा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. आई – वडील, पत्नी, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, हितचिंतक यांच्या जोरावरच आजवर सफल झालो आहे.’

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!