• केएमटी कार्यालयात वाहतूक सुरक्षा अभियान
कोल्हापूर • प्रतिनिधी
के.एम.टी. उपक्रमाकडील चालक अत्यंत चांगल्या पद्धतीने वाहन चालनाचे काम करीत आहेत. तथापि, काही वाहनचालक बसेस रस्त्यावर अत्यंत वेगाने चालवतात. वाहनचालकांनी वेगाची मर्यादा राखणे आवश्यक आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब, रस्त्यावरुन चालणारे पादचारी या सर्वांची जबाबदारी चालकावर असते. याकरिता झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नल व वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हि चालकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षक श्रीमती स्नेहा गिरी यांनी केले.
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम असलेल्या ‘केएमटी’च्या शाहू क्लाॅथ मार्केट येथील कार्यालयात ” वाहतूक सुरक्षा ” अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्नेहा गिरी यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत केएमटी बसचालक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
चालकांनी मद्यपान व धुम्रपान अशा व्यसनांपासून अलिप्त राहावे. त्याचबरोबर वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळावा, अशा सूचनाही श्रीमती स्नेहा गिरी यांनी केल्या.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे यांनी चालकांचे आयुष्य वाहनावर अवलंबून असून, वाहन चालकाकडून रस्त्यावर वाहन चालवताना होणाऱ्या चुकीला माफी नाही अशी सूचना केली. चालकाच्या चुकीचा फटका प्रवाशांना बसतो त्यामुळे वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून वाहनचालकांनी सुरक्षितपणे बस चालविणे आवश्यक आहे. वाहनाला मोठे आरसे लावणे, वेगावर नियंत्रण, बस फेरीच्या वेळेचे नियोजन करणे तसेच कर्णकर्कश हॉर्न बदलणे अशा सूचना केल्या.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यवाह प्रसाद बुरांडे यांनी वाहन चालकांनी बसमधील प्रवाशांच्या कुटुंबाचे रक्षण करण्याची जबाबदारी चालकाची आहे. के.एम.टी.चे चालक यांची सामाजिक बांधिलकी मोठी असून प्रवाशांना सुरक्षिततेबरोबर सौजन्याने प्रवासी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार यांनी केले. कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक रघुनाथ धुपकर, अपघात विभाग प्रमुख प्रदीप जाधव, चालक निदेशक गजानन लोळगे, सहा.वाहतूक निरीक्षक सुनिल पाटील तसेच चालक व कर्मचारी उपस्थित होते. सहा. वाहतूक निरीक्षक सुनिल जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
——————————-