कोल्हापूर • प्रतिनिधी
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोल्हापूर शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरामध्ये भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी सोडीअम हायपो क्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.
याबाबत उपआयुक्त निखिल मोरे यांनी मुख्य आरोग्य निरिक्षक यांना शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने चार ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये ऋणमुक्तेश्वर भाजी मार्केट, रेसकोर्स भाजी मार्केट, राजारामपुरी भाजी मार्केट, पाडळकर मार्केट, शिंगोशी मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, कसबा बावडा मार्केट, रंकाळा बसस्टॅण्ड, संभाजीनगर बसस्टॅण्ड, महाद्वार रोड, सीबीएस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर, शाहूपुरी, करवीर पोलिस ठाणे, राजारामपुरी व लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन याठिकाणी हायपो क्लोराईडची औषधाची फवारणी करण्यात आली.