कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचे संपूर्ण शुल्क माफ: डॉ.संजय पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी व आर्किटेक्चरसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘ओरिएन्टेशन’ समारभ  गुरुवारी पार पडला. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनामुळे पालक गमावलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारत त्यांना चारही वर्षांची फी माफ करण्याची घोषणा डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. त्याचबरोबर विविध शाखामध्ये प्रवेश घेतलेल्या ८ गुणवत्ताधारक  विद्यार्थ्याना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती’ देण्यात आली.
      १९८३ पासून अभियांत्रिकी शाखांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला गतवर्षी स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला. या महाविद्यालयातील २०२१-२२ साठी विविध अभियांत्रिकी शाखामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही मालदे, आर्किटेक्चर विभागाचे डीन आर. जी. सावंत,  डीन (ॲडमिशन) प्रा. रविंद्र बेन्नी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. नवनीत सांगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डी. वाय. पाटील ग्रुपचे सचिव धरणगुत्ती, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
      डॉ. संजय पाटील यांनी डी. वाय. पाटील ग्रुप व महाविद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा मांडत नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मनःपूर्वक प्रयत्न केल्यास यश निश्चित असल्याचे सांगत त्यांनी महाविद्यालयावर विश्वास दाखवणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे अभिनानंदन केले. महविद्यालयात उभे राहत असलेल्या ‘सेंटर फॉर इंव्हेशन, इनोव्हेशन अँड इंक्यूबेशन’ मुळे उत्तम अभियंते बनण्याबरोबरच नोकरी-उद्योगासाठी परिपूर्ण विद्यार्थी बनतील असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.
      डी. वाय. पाटील ग्रुपने नेहमीच सामजिक बांधिलकी पाळून समाजाभिमुख काम केले आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोनामुळे पालक गमावलेल्या १० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची घोषणा यावेळी डॉ. पाटील यांनी केली. या १० विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी चारही वर्षाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचे त्यांनी जाहीर करताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.  यावेळी विविध शाखामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती प्रमाणपत्र देऊन डॉ. पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
      कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यावर्षी तब्बल १०३६ विद्यार्थ्यांनी या महविद्यालयात प्रवेश घेतला असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रवेश झालेले महाविद्यालय ठरले असल्याचे सांगितले.
     प्राचार्य संतोषकुमार चेडे यांनी प्रास्ताविक केले. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. नवनीत सांगळे यांनी शैक्षणिक वर्षाची रचना, राबवले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती दिली. प्रा. राधिका ढणाल व प्रा. अक्षता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. रविंद्र बेन्नी यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
                           ………..
    अभियांत्रिकीच्या विविध शाखामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली. देवयानी अमृत देसाई, वसुंधरा राजेंद्र लायकर, प्रज्ञेश जयदीप जामदार, सौरीश ऋषिकेश साळुंखे,  अनिकेत सुधाकर माने, पौर्णिमा नागय्या हिरेमठ, संस्कृती अश्विनकुमार पवार पाटील, निरंजन श्रीधर गुरव या विद्यार्थ्याना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट शिष्यवृत्ती’चा लाभ मिळाला आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!