“शिवाजी विद्यापीठाच्या डी.लिट.मुळे मातेच्या कुशीतील निरागस बालकासारखा आनंद”

Spread the love

• लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या होत्या कृतज्ञ भावना
कोल्हापूर :
      शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेकडून डी.लिट. ही सन्मानदर्शक पदवी स्वीकारताना आईच्या कुशीतील निरागस बालकाचा आनंद आपल्या मनी दाटला आहे, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया लता मंगेशकर यांनी व्यक्त केलेली होती.
      शिवाजी विद्यापीठाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना २१ नोव्हेंबर १९७८ रोजी म्हणजेच सुमारे ४३ वर्षांपूर्वी डी.लिट. ही सर्वोच्च सन्मानदर्शक पदवी प्रदान करून गौरविले आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.एस. भणगे यांच्या हस्ते मंगेशकर यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. बॅ. अप्पासाहेब पंत या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख अतिथी होते. कुलगुरू डॉ. भणगे यांनी त्यावेळी लता मंगेशकर यांना विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात आलेल्या गौरवपत्राचे वाचन केले होते.
      डी.लिट. स्वीकारल्यानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या अत्यंत छोटेखानी भाषणात विद्यापीठाप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या होत्या की, “आयुष्यात आजवर अनेक सन्मान लाभले, मात्र शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेने केलेल्या गौरवाचे मोल शब्दातीत आहे. मातेच्या कुशीत पहुडलेल्या निरागस बालकाला जो आनंद लाभतो, तसा आनंद आज माझ्या मनी दाटला आहे. याप्रसंगी मला माझ्या मातापित्यांची खूप आठवण होते आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला संगीताच्या माध्यमातून आनंद व समाधान देण्यासाठी मी प्रतिबद्ध राहीन, याची ग्वाही या निमित्ताने देते.”
     आज लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर विद्यापीठासह संपूर्ण करवीर नगरीत त्यांच्या या गौरवाच्या आणि त्यांनी केलेल्या भाषणाच्या आठवणी ताज्या झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!