डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा बुधवारी ९ वा दीक्षांत समारंभ


कोल्हापूर • प्रतिनिधी
      डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ९ वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि.१७) कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी अभिनेते  रंगनाथन माधवन, साहित्यिक प्रा. कुन्तीनाथ करके यांना सन्माननीय डी.लिट. आणि एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना सन्माननीय डी.एस्सी. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११ वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार आदी उपस्थित होते.
      डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून सलग दुसऱ्यांदा नॅकचे  “अ’ मानांकन प्राप्त झाले. २०१८ साली मानव संसाधन विकास मंत्रालच्या सर्वेक्षणामध्ये ९७ वा क्रमांक प्राप्त झाला होता. उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कारानेही विद्यापीठाला गौरवण्यात आले आहे. इंडिया टुडे व नेल्सनच्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे व राष्ट्रीय स्ततरावर १५ वे उत्कृष्ट कॉलेज ठरले आहे. महाराष्ट्र इकॉनॉमिक समिट, मुंबई या संस्थेमार्फत ‘प्राईड ऑफ  महाराष्ट्र’  पुरस्कार व  ‘बेस्ट इन्स्टिटयूट’ म्हणून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास नुकतेच गौरविण्यात आले. विद्यापीठाकडून पीएच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जात आहे. आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉ. मुदगल यांनी यावेळी सांगितले.
       दीक्षांत समारंभात एकूण ३६१ विद्यार्थ्यांना  पदवी  व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ९ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असून २ विद्यार्थ्याना एक्सलन्स ऑफ रिसर्च म्हणून सन्मानित केले जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *