डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला स्वायत्तता

युजीसी व शिवाजी विद्यापीठाची मान्यता ; स्वायत्त संस्थेत प्रवेश सुरू
कोल्हापूर • प्रतिनिधी
    गेल्या ३६ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेतून हजारो अभियंते घडविणाऱ्या कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाला युजीसी नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा (Autonomous Institute) प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासूनचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवीचे प्रवेश महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसार होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता होते.
     श्री. पाटील म्हणाले की, शिक्षणतज्ज्ञ व माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील यांनी १९८४मध्ये उच्च व तंत्र शिक्षणाची संधी कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी या हेतूने डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असून नॅकची ‘ ए ‘ श्रेणी प्राप्त आहे. नवी दिल्ली येथील युजीसीच्या उच्चस्तरीय समितीने दि.३० व ३१ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर महाविद्यालयास १० वर्षासाठी स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने या वर्षापासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी व एम.टेक.चे प्रवेश स्वायत्त संस्था म्हणून करण्यास परवानगी दिली आहे.
     ते म्हणाले की, महाविद्यालयातील आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमालाही युजीसी व शिवाजी विद्यापीठाने स्वायत्त संस्थेचा अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे.अशी मान्यता मिळविणारे हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. तसेच बी.ई.कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स या दोन नवीन अभ्यासक्रमांना AICTE नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ यांची मान्यता मिळाली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ६०  प्रवेश क्षमता आहे. त्याचबरोबर स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाल्याने महाविद्यालयाने स्वतःचा स्वतंत्र अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती, गुणांकन पध्दती विकसित केली आहे. औद्योगिक मनुष्यबळाच्या मागणीनुसार सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उद्योजकीय अनुभव मिळावा यासाठी महाविद्यालयाने ५०पेक्षा जास्त उद्योजकांसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन ते सहा महिने उद्योगामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.
     पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. संतोष चेडे, चिफ एचआर ऑफिसर श्रीलेखा साटम, चिफ फायनान्स ऑफिसर श्रीधर नारायण स्वामी, रजिस्ट्रार डॉ.एल.व्ही. मालदे यांच्यासह डीन, विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *