कोल्हापूर • प्रतिनिधी
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, न्यू दिल्ली यांच्यामार्फत कोच एज्युकेशन स्कॉलरशीप प्रोग्रॅम अंतर्गत महिला फुटबॉल प्रशिक्षकांसाठी एआयएफएफ इ लायसन्स सर्टिफिकेट कोर्स ८ नोव्हेंबरपासून छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू झाला. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती व सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यातील महिला फुटबॉल प्रशिक्षकांसाठी हे प्रमाणपत्र प्रशिक्षण असून ते ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. प्रशिक्षण केएसए च्यावतीने घेणेत येत आहे.
प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती तसेच फिफा १७ वर्षाखालील वुमन्स वर्ल्ड कप इंडिया २०२२ ॲण्ड एएफसी वुमन्स एशियन कप इंडिया २०२२ यांच्या प्रोजेक्ट डायरेक्टर नंदिनी अरोडा, श्री.अरिंजय, लिंबाचे सचिव साऊटर वाझ, मुख्य प्रशिक्षक शैलेश करकेरा, सहा. प्रशिक्षक अखिल कोठारी, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन सचिव सुधाकर राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, अमर सासने, नितीन जाधव, संभाजीराव पाटील – मांगोरे, विश्वंभर मालेकर – कांबळे, मनोज जाधव, दिपक राऊत, दिपक घोडके, संजय पोरे उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महिला खेळाडू व प्रशिक्षक निर्माण होण्यासाठी एआयएफएफ च्यावतीने आयोजीत होत असलेल्या या प्रमाणपत्र प्रशिक्षणाची अत्यंत मदत होणार असून त्याबद्दल त्यांनी एआयएफएफचे आभार व्यक्त केले.
फिफा लोकल ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर नंदिनी अरोडा यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रात होत असलेल्या या प्रशिक्षणाची व विशेषतः कोल्हापूरातील छत्रपती शाहू स्टेडियमधील या प्रशिक्षणाची विशेष नोंद घेतली. कोल्हापूरातील लोकप्रिय फुटबॉल खेळाची व त्यास मिळत असणाऱ्या प्रचंड प्रतिसादाचा विशेष उल्लेख केला. भारतामध्ये पुढील वर्षी फिफाच्यावतीने १७ वर्षाखालील वुमन्स वर्ल्ड कप इंडिया २०२२ व एएफसी वुमन्स एशियन कप इंडिया २०२२ होणार आहे. त्यानिमित्त्याने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, न्यू दिल्ली यांच्यावतीने भारतामध्ये महिला खेळाडू व प्रशिक्षक निर्माण होण्यासाठी या प्रमाणपत्र प्रशिक्षण आयोजनाची विशेष मोहीम राबविणेत येत आहे. भविष्यात कोल्हापूरच्या महिला फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक वाढीसाठी विशेष लक्ष देणार आहे.
केएसए सचिव माणिक मंडलिक यांनी आभार मानले तर सहसचिव राजेंद्र दळवी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.