महिला सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजना गतीने राबविणार: जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     जिल्ह्यातील कोणतीही महिला अत्याचाराला बळी पडू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवाव्यात अशा सूचना देऊन सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची संख्या वाढवा, नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करून घ्या, महिलांसाठीच्या १०९१ हेल्पलाईनवर तात्काळ प्रतिसाद व मदत उपलब्ध करून द्या, संकटकालीन परिस्थितीत महिलांना जलद मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘सुरक्षा ॲप’  कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
     महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, प्र. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले , विधी सल्लागार आशिष पुंडपळ तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
     महिला व बाल विकास विभागाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दूरध्वनी क्रमांक व हेल्पलाईन क्रमांक आदी विषयांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित महिलांची टीम तयार करून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात प्रत्यक्ष जावून माहिती देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नियोजन करावे, अशा सूचना देवून महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.
      बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १०९१ या महिलांसाठीच्या हेल्पलाइन क्रमांकावर स्वतः फोन करून हा नंबर सुरू असल्याची खात्री केली. तसेच संकटग्रस्त महिलांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.
      अत्याचार झालेल्या महिलांसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ नवीन जागेमध्ये सुरू होण्यासाठी महिला बाल विकास विभागाने महसूल विभागाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, यांसह महिला व बालविकास विभागाच्या विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!