गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील मृत्युदर कमी होण्यासाठी प्रयत्न करा: मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर • प्रतिनिधी
      गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात तपासण्यांची संख्या  वाढवण्यात आली आहे. यामुळे रुग्णदर अधिक आढळून येत असला तरी मृत्युदर कमी होण्यासाठी आरोग्य, महसूल, जिल्हा परिषदेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
     गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत दुरदृश्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी(ऑनलाइन), उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
     मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील रुग्णांसाठी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. प्रशासनाने देखील सज्ज राहून आरोग्य सुविधा वाढवाव्यात. गृह अलगिकरण प्रभावीपणे करा. प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंधांचे पालन होत असल्याची पाहणी करा, असे सांगून ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असले तरीदेखील नागरिकांनी मास्कचा वापर करणे व गर्दीत जाणे टाळायला हवे. ६० वर्षावरील नागरिकांनी लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      आमदार राजेश पाटील यांनी या भागातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती देऊन आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा व यंत्रसामग्रीबाबत सांगितले.
     उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, सध्या गडहिंग्लज तालुक्यात ५७१ बाधित रुग्ण असून मृत्युदर ३.४३ टक्के आहे. तर चंदगड तालुक्यात ३४८ बाधित रुग्ण असून मृत्युदर ३.१३ टक्के आहे. गृह अलगिकरणावर भर, प्रतिबंधित क्षेत्रात कडक नियम, गर्दीवर नियंत्रण आदी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
     उपविभागीय अधिकारी संपत खिलारी म्हणाले, आजरा तालुक्यात बाधित रुग्ण ३३७ असून मृत्युदर ३.१३ टक्के आहे. तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली असून रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *