निसर्गमित्र संस्थेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      निसर्गमित्र कोल्हापूर संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय स्थानिक फळे व भाज्या संवर्धन वर्ष २०२१ अंतर्गत दि. १ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विविध कृतीशील उपक्रमांचे आयोजन अरण्यात आले होते.
      निसर्गमित्र कोल्हापूर व सागरमाळ जेष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने “वन्यजीव सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “वन्यजीव संरक्षणात माझा सहभाग”, “रेड्याची टक्कर या स्थळाचा इतिहास”, “पर्यावरण संरक्षणात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग” याबरोबरच माळुंगे व कोहळा या वन्यफळांचे आरोग्यदायी महत्त्व व त्यांचा आहारातील उपयोग तसेच पर्यावरणपूरक शाश्वत शेती, कृषी पर्यटनातून कृषी क्षेत्राचा विकास, मधमाशा, बेडूक व घुबड अशा शेतीपूरक वन्यजीवांचे संरक्षण या विषयांवर सर्वश्री डॉ. मधुकर बाचुळकर, दिलीप पेटकर, अनिल चौगुले, जनार्दन पवार, शेखर सुतार यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी “रानभाज्या संवर्धन” ही चित्रफीत दाखवण्यात आली.
     कोरोना काळात शाळा, महाविद्यालय व बहुतांश व्यवहार बंद असतानादेखील आपआपल्या परिसरातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष प्रयत्नशील राहिलेले सोहम माळी, बाबाराजे महाडिक, शेखर सुतार, रंगराव वाडकर, संजय शिंदे, बाबू धनगर, अनिल पाटील यांनी अनुभवकथन केले. या सर्वांचा “वृक्षारोपण व संवर्धन” विषयी पुस्तक व मधमाशा संवर्धनासाठी उपयुक्त ठरणारे “तमालपत्रीचे रोप” भेट देऊन गौरव करण्यात आला.
      निसर्गमित्रच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी, कुंभारगल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करून सुयोग्य कचराव्यवस्थापनातून पर्यावरणरक्षणासाठी कृतीशील पाऊल उचलले.
      याबरोबरच, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी गटाने कोल्हापूर शहर परिसरातील निसर्गमित्रांनी केलेल्या विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला.
     या सर्व कार्यक्रमांचे संयोजन सर्वश्री दिलीप पेटकर, पराग केमकर, यश चौगुले, अस्मिता चौगुले,अजित पाटील, अजित अकोळकर, सतीश वडणगेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!