केएसए आयोजित फिटनेस व स्पोर्टस्‌ विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात

Spread the love

• शारिरीक क्षमता व मानसिकता वाढविण्यासाठी मार्गदर्शन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (केएसए) च्यावतीने व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) च्या सहकार्याने सर्व खेळातील खेळाडूंसाठी फिट्‌नेस व स्पोर्टस्‌ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत डॉ.संदीप चौधरी व डॉ. स्वरूप सावनूर यांनी संवाद साधला व विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. त्यांनी शारिरिक क्षमता व मानसिकता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
     मंगळवारी झालेल्या या कार्यशाळेत ऑनलाईन ९९२ व युटयूबवर ४०२ असे एकूण १३९४ विविध खेळातील खेळाडू, प्रशिक्षक व पालक  प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
     केएसए अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष  श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सध्या कोविड-१९ या  महामारीमुळे क्रीडाक्षेत्राचे अत्यंत नुकसान झाले आहे. खेळाडूंच्या मैदानावरील सरावात सातत्य राहिलेले नाही. भविष्यातही नव्याने सुरूवात कशी करावी, मानसिक व शारिरीकदृष्टया खेळाडूंमध्ये आलेले नैराश्य कसे कमी करता येईल यासाठी तज्ज्ञांच्याबरोबर थेट संवाद साधणे गरजेचे होते. त्यामुळे केएसए च्यावतीने ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
     क्रीडाक्षेत्रातील तज्ज्ञ व भारतीय हॉकी संघाचे माजी फिजिओथेरिपिस्ट डॉ. संदीप चौधरी यांनी संवाद साधताना सांगितले की, सध्या कोविड-१९ लगेच ओसरेल असे वाटले होते, परंतु गेल्या दीड वर्षापासून सातत्याने त्याचा प्रसार सुरूच आहे. आपण दोन – तीन दिवस सरावाला गेलो नाहीतर आपल्या खेळातील कौशल्यामध्ये फरक पडलेला दिसतो. मात्र कोविडमुळे सरावामध्ये फार मोठे अंतर पडलेले आहे. यानंतर नव्याने सरावाला सूरूवात करताना शारिरीक क्षमता आपली काय आहे हे तपासले पाहिजे. तसेच शरीरातील स्नायू आकसलेले असणार, तसेच  सामर्थ्य, स्थिरता, गती, सहनशक्ती व क्षमता कमी झालेली असणार आहे. त्याचबरोबर वजन कमी किंवा जास्त झालेले असणार आहे, त्यामुळे मैदानावर येताना घाई – गडबड न करता रिकव्हरी केली पाहिजे. त्यासाठी १०० टक्के सराव न करता ४० ते ५० टक्के या पद्धतीने सराव सुरू करावा. यानंतर प्रत्येक आठवड्यातून १० टक्के प्रमाणे सराव वाढवावा. सरावाचे वेळापत्रक करावे. स्ट्रेचिंग व फ्लेग्जिबिल्टी सराव करावेत. वरील सर्व सराव आपल्यामध्ये आत्ता असणाऱ्या क्षमतेनुसार करावेत व त्यामध्ये हळूहळू वाढ करावी. ताबडतोब एकदम जास्त प्रमाणात सराव सुरू केल्यास दुखापत  होणेची संभवता आहे. अशाप्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी योग्य पद्धतीने वॉर्मअप, स्ट्रेचिंग, कुलडाऊन, हायड्रेशन, न्यूट्रिशन, प्रॉपर टेक्निक, योग्य साधने यांचा वापर करावा. थकवा आल्यास जादा सराव करणे थांबवावे. तसेच दुखापत झाल्यास  प्रशिक्षकांपासून लपवू नये. प्रथमोपचारासाठी सी.पी.सी.आर. कोर्स असून तो जास्तीत-जास्त प्रशिक्षकांनी करावा.
     याविषयाची कार्यशाळा झाल्यानंतर प्रश्र्नोत्तरे झाली. विचारलेल्या निवडक प्रश्नांना डॉ. संदीप चौधरी यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी कार्यशाळेचे चेअरपर्सन ॲथलेटिक्स्‌ कोच सुभाष पोवार यांनी संपूर्ण विषयाचे थोडक्यात विश्लेषण केले.
     १७ वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप भारतीय फुटबॉल संघाचे व किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट संघाचे  मेंटल कंडिशनिंग ॲण्ड पिक परफॉर्मन्स प्रशिक्षक, सिनियर स्पोर्टस्‌ सायकॉलॉजी कन्सलटंट डॉ. स्वरूप सावनूर यांनी खेळाडूंची मानसिकता या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या कोविड – १९मुळे खेळाडूंचे मन विचलीत झाले आहे. त्या मनाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. खेळाडूंची मानसिकता बदलेणे गरजेचे आहे. मनाल शक्तीशाली बनविले पाहिजे. प्रत्येकास स्वत:ची शारिरीक मोजमाप करता येते परंतु मनाची मोजमाप करणे अवघड जाते. त्यासाठी मानसिकता, आत्मविश्र्वास, कामगिरीतील सुसंगतता वाढविली पाहिजे. मानसिक दडपण, नकारात्मक विचार कमी झाले पाहिजेत, ध्येय ठरले पाहिजे. त्यासाठी भविष्यातील कामगिरीचा विचार न करता तीन-चार महिन्यानंतर ध्येयाची वाटचाल ठरविली पाहिजे. सरावाच्यावेळी स्व: शिस्तपालन शिकणे गरजेचे आहे.
     या कार्यशाळेत विचारलेल्या निवडक प्रश्नांना डॉ. स्वरूप सावनूर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी कार्यशाळेचे चेअरपर्सन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तायक्वॉंदो खेळाडू प्रविण बोरसे यांनी संपूर्ण विषयाचे थोडक्यात विश्लेषण केले.
     केएसएचे फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.
     ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी  प्रथमोपचारासाठी सी.पी.सी.आर. कोर्स व पालकांसाठी कार्यशाळा केएसएच्यावतीने लवकरच घेण्यात येईल असे सांगितले. 
     यावेळी केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
——————————————————-

 Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!