घरकुलांचा गृहप्रवेश हा जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण: मंत्री मुश्रीफ



• कागलच्या गणेशनगरमध्ये एक हजार घरकुलांचे वाटप
 कोल्हापूर • प्रतिनिधी
      घरकुल संकुलामध्ये गोरगरिबांचा गृहप्रवेश हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावनिक उद्गार ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. पुण्याई ही शिदोरी संपूर्ण आयुष्यभर पाठीशी राहील, असेही ते म्हणाले.
       कागल शहरातील गणेशनगरमध्ये नागरिकांना एक हजार घरकुलांचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प तडीस नेला आहे. बाजार मूल्यानुसार बारा ते पंधरा लाख रुपये किंमत होणारे हे घरकुल अवघ्या ५० हजारात मिळाले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी होत्या.    
      संकुलातील नागरिकांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे टेरेसवरून पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले. घरकुल संकुलासमोरील गुढीचे पूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले व घरकुलातील नागरिकांसोबतच मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही पुरणपोळीचा आनंद लुटला.
      यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे स्वप्न बघितले होते. या घरकुलात राहून मुलाबाळांचे चांगले शिक्षण पूर्ण करा आणि जीवनमान उंचवा. राहिलेली अडीचशे घरेही दसऱ्यापर्यंत पूर्ण करून देऊ.
      ते पुढे म्हणाले, रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही एक हजारावर घरे पूर्ण झाली आहेत. म्हाडाच्या माध्यमातून  कागलच्या सुपुत्रांना वीस लाखापर्यंतचे घर देणार अवघ्या पाच लाखात घर देऊ. यापुढेही भाड्याने राहणाऱ्या तसेच कमी जागेमुळे अडचणीत राहणार्‍यांना  दोन हजारावर कुटुंबांना आरसीसी घरे देणार आहोत.
      मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे गोरगरिबांचे दीनदलितांच्या आधारवड होते. त्यांचे वारसदार असलेले छत्रपती शाहू महाराजांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावे, अशी माझी इच्छा होती. परंतु कोरोना परिस्थितीमुळे ती पूर्ण झाली नाही.  येणाऱ्या काळात छत्रपती शाहू महाराजांना या विभागात आणू आणि येणाऱ्या दसऱ्यात महाराज गोरगरीब आणि दीन- दलितांच्या पंगतीला बसून जेवतील, असा आशावादही  मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
      यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केले.
      व्यासपीठावर उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेविका नूतन गाडेकर, नगरसेविका सौ. माधुरी मोरबाळे, नगरसेवक विवेक लोटे, संग्राम लाड, मुख्याधिकारी पंडित पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
       स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार सौरभ पाटील यांनी मानले.      
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *