युरो’चा हिरो इटली!

Spread the love

• इंग्लंडला पराभवाचा धक्का
कोल्हापूर • प्रतिनिधी
     पेनल्टी शूटआऊटवर इटलीने इंग्लंडला पराभवाचा धक्का देत आपणच ‘युरो’चा हिरो असल्याचे सिद्ध केले. युरो कप फुटबॉल स्पर्धेत शेवटपर्यंत थरारक झालेल्या सामन्यात अखेर पेनल्टी शूटआऊटवर इटलीने ३-२ असा विजय साकारला अन् ५३ वर्षांनी दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. इटलीने दिलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे इंग्लंडचे पहिले विजेतेपद साकारण्याचे स्वप्न भंगले असून त्यांना  उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
      युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि इटली यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ याने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात इटलीला गोलची परतफेड करता आली नाही. उत्तरार्धात इटलीने वेगवान खेळ केला. त्यामध्ये त्यांना कॉर्नरकिक मिळाली. कॉर्नरवरून मारलेल्या फटक्यावर चेंडू लिओनार्डो बोनुचीला मिळाला. त्यावर कोणतीही संधी न दवडता बोनुचीने गोल केला आणि ६७ व्या मिनिटास संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. पूर्णवेळेत  सामना १-१ गोल असा बरोबरीत राहिला. अतिरीक्त वेळेत दोन्ही संघांनी खोलवर चाली रचल्या परंतु गोल करण्यात अपयश आल्याने सामना बरोबरीत सुटला.
     अखेर सामना पेनल्टी शूटआऊटवर गेला. इंग्लंडकडून कर्णधार हैरी कैन व हैरी मैगुओर यांनी गोल केले. त्यांच्या मार्कस रैशफोर्डचा फटका वाया गेला तर बुकायो साका और जेडन सॅंचो यांचे फटके इटलीचा गोलरक्षक डोनारूमा याने रोखले. इटलीच्या लिओनार्डो बोनुची, डोमनिकाे बेरार्डी, फेडरिको यांनी अचूक गोल केले. त्यांचे आंद्रेई बेलोटी व जोर्गिन्हो गोल करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडचा गोलरक्षक पीकफोर्डने दोन फटके रोखले. अखेर इटलीने पेनल्टी शूटआऊटवर ३-२ ने विजयावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी इटलीने १९६८ ला पहिल्यांदा विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर ५३ वर्षांनी पुन्हा एकदा जेतेपद पटकावले.
                        —————–
                   युरो कप स्पर्धेचे विजेते…… 
     युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या १६ व्या हंगामात इटलीने जेतेपद साकारले. १९६८ नंतर इटलीचे हे दुसरे विजेतेपद आहे. ही स्पर्धा १९६० पासून प्रत्येक चार वर्षांनी होते. आतापर्यंत झालेल्या १५ स्पर्धेत जर्मनी संघ सहावेळा फायनलमध्ये पोहोचला. त्यांनी १९७२, १९८० आणि १९९६ असे तीनवेळा  जेतेपद पटकावले आहे. स्पेनच्या संघानेही चारवेळा फायनल गाठली असून यात त्यांनी १९६४, २००८ आणि २०१२ असे तीनवेळा जेतेपद मिळवले आहे. फ्रान्सने तीनवेळा फायनलमध्ये धडक मारताना १९८४ आणि २००० मध्ये विजेतेपद मिळविले. सोविएत युनियन (१९६०), चेक प्रजासत्ताक (१९७६), पोर्तुगाल (२०१६), नेदरलॅंड (१९८८), डेन्मार्क (१९९२), ग्रीस (२००४) यांनी प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!