कोल्हापूर • प्रतिनिधी
निसर्ग मित्र संस्था व आदर्श सहेली मंच, दि. वि. फाउंडेशन, वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्यावतीने गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा वनस्पतीजन्य रंगापासून तयार करण्याची कार्यशाळा कोल्हापूरतील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे पार पडली.
कार्यशाळेमध्ये आदर्श सहेली मंचच्या राणिता चौगुले यांनी हळद, बीट, शेंद्री, पळस यांच्या फुलापासून तयार केलेला रंगापासून साखरेच्या माळा तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली.
यानंतर भारतीय सण व पर्यावरण याविषयी निसर्ग मित्रचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाप्रसंगी गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकाने कडुलिंबाचे रोप दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करावे, तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वाना आवाहन केले की, गुढीपाडवा झाल्यानंतर जी कडुलिंबांची पाने असतात ती संस्थेकडे जमा करावी. कडुलिंबाच्या पानांचा काय उपयोग होऊ शकतो हे त्यांनी सांगितले.
धान्याला कीड लागू नये म्हणून कडूलिंबाच्या पानापासून तयार केलेल्या गोळ्या तयार करुन देणार असल्याने या संधीचा लाभ घ्यावा, असेही अनिल चौगुले यांनी आवाहन केले.
यावेळी प्रास्ताविक सौ. सुनंदा वडणगेकर यांनी केले. संयोजन पराग केमकर, महादेव वडणगेकर, आशा चौगुले, यश चौगुले, विश्वास चौगुले यांनी केले. सतीश वडणगेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, तयार करण्यात आलेल्या साखरेच्या माळा व कडुलिंबाच्या गोळ्या मिळण्यासाठी २८२३/४८ ‘बी ‘ वॉर्ड महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————-