राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीचित्रांचे, आदेश, महत्वाचे कायदे व कागदपत्रांचे प्रदर्शन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीचित्रांचे, आदेश, महत्वाचे कायदे, कागदपत्रे प्रदर्शन राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या हस्ते २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता शाहू मिल येथे होणार आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित रहाणार आहेत.
      कोल्हापूर बरोबरच संपूर्ण देशात सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करावाच लागतो. केवळ २८ वर्षाच्या आपल्या कारकीर्दीत समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घालून दूरदृष्टीने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यांनी विकासाचे नवे पर्व निर्माण केले.
       ६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाले. यावर्षी या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या शंभर वर्षाचा मागोवा घेतला तर महाराजांनी दूरदृष्टीने निर्माण केलेले कोल्हापूर हे आपल्या देशासाठी सर्वांगीण विकासाचे मापदंड ठरले आणि सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी पथदर्शी ठरले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. ज्यामध्ये आजवर कधीही कोठेही न पहायला मिळालेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. महाराजांच्या कार्याचा विचारांचा ठसा असलेली महत्वपूर्ण कागदपत्रे, कायदे, आदेश यांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. 
       हे प्रदर्शन २४ एप्रिल ते २२ मे अखेर शाहू मिल येथे सकाळी ९ ते रात्री ९ चे दरम्यान सुरू रहाणार आहे. या संशोधनंपूर्ण प्रदर्शनास आवर्जुन वेळ काढून पाहण्यासाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!