EZY KOLHAPUR या ॲपवरून ऑनलाईन घरपोच जीवनावश्यक वस्तू

Spread the love

• महापालिका व सेवा इंन्फोटेक यांच्यावतीने सुविधा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      EZY KOLHAPUR हे ॲप डाऊनलोड करुन ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू मागविण्याची सुविधा सोमवारपासून महापालिका व सेवा इंन्फोटेक यांच्यावतीने सुरु करण्यात आलेली आहे. उप-आयुक्त निखिल मोरे व सहा.आयुक्त चेतन कोंडे यांच्या हस्ते हे ऑनलाईन ॲप कार्यान्वीत करण्यात आले आहे. यावेळी सेवा इंन्फोटेकचे जयराज चव्हाण उपस्थित होते.
      शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरीक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली बाहेर पडतात. महापालिका पथक विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्यावर वेळोवेळी दंडात्मक कारवाई करत आहे. शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढू नये व त्याचबरोबर कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने भाजीपाला, फळे, किराणा माल, दूध इत्यादींची दैनंदिन गरज पाहता. घरी बसून नागरिकांना कशी सेवा देता येईल. त्याचबरोबर घरपोच जीवनावश्यक साहित्य कसे नागरिकांपर्यंत पोहचविता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. EZY KOLHAPUR (ईझी कोल्हापूर) या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून ‍हि सेवा सुरु करण्यात आली आहे. हे ॲप सेवा इंन्फोटेकचे जयराज चव्हाण यांनी विनामोबदला महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिलेले आहे.
      या ॲपद्वारे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन ऑर्डर करुन घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. या ॲपवर २५० पेक्षा जास्त व्यवसायिकांनी आपले रजिस्ट्रेशन केलेले आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागातील मेडिकल स्टोअर, किराणा दुकानदार यांची चार विभागीय कार्यालयनिहाय यादी उपलब्ध करुन दिलेली आहे. या ॲपद्वारे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू (उदा. किराणा, भाजीपाला, फळे, औषधे, चिकण-मटण इत्यादी) घरबसल्या या घरपोच मिळणार आहे. हि सेवा प्रभागनिहाय स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सहाय्याने प्रत्येक प्रभागामध्ये सुरळीत ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्यांना अत्यावश्यक मालाची विक्री करावयाची आहे. त्यांना या ॲपवर ऑनलाईन आपले रजिस्ट्रेशन मोफत करता येणार आहे. या ॲपवर प्रभाग समिती सचिवांची यादी व त्यांचे संपर्क क्रमांकही दिलेले आहेत. कोणालाही जर कोवीड काळामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करावयाची ईच्छा असल्यास त्याचीही नोंदणी या ॲपद्वारे करता येते.
      त्याचबरोबर याॲपमध्ये बेड संदर्भातील माहिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, सीपीआर हॉस्पीटल, महापालिकेचे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इत्यादींचे फोन नंबर्सची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये नागरिकांना कोरोनाबाबतीत उद्भवणाऱ्या काही समस्या व सुचना असतील तर त्याही  या ॲपद्वारे नागरिकांना नोंद करता येणार आहे. सदरचे ॲप मराठी व इंग्रजी दोन्हीही भाषेमध्ये वापरता येईल.
      हे ॲप सुरु करण्यासाठी प्लेस्टोअरमधून EZY KOLHAPUR हे ॲप डाऊनलोड करा अथवा www.ezykolhapur.com या संकेतस्थळाला भेट द्या. यानंतर नागरिकांना या ॲप किंवा संकेतस्थळावरुन जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर देता येईल. ऑर्डर दिल्यानंतर संबंधीत दुकानदार आपल्याला लागणाऱ्या वस्तू घरपोच देतील. तरी महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या ॲपद्वारे जीवनावश्यक वस्तू मागवाव्यात, रस्त्यावरील गर्दी कमी करावी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!