• अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी संपर्क साधावा: श्री. क्षीरसागर
कोल्हापूर • प्रतिनिधी
गेल्या वर्षापासून सुरु असलेला कोरोना रोगाचे थैमान थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची व्याप्ती अधिक वाढत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र राज्य शासन, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारीसह सर्वच शासकिय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यातील नागरिकांची कुटुंबांप्रमाणे काळजी घेत आहेत. राज्य शासनाने सुरु केलेली “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी” मोहिमेनुसार कोरोना रुग्णांवर उपचार आणि लसीकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गतवर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी शिवसेना “माझे शहर-माझी जबाबदारी” ही मोहिम हाती घेत आहे. यामध्ये हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधून अत्यावश्यक रुग्णसेवा आणि कोरोनाबाबतची अधिक माहिती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात म्हटले आहे कि, कोल्हापूरवासियांचे दातृत्व जगजाहीर आहे. गतवर्षीच्या कोरोना लढ्यात कोरोनायोद्धांच्या कर्तृत्वाने आणि शहरवासियांनी दाखविलेल्या धैर्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासन यशस्वी झाले होते. परंतु पुन्हा या रोगाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सैरभैर होतात. कोणत्या दवाखान्यात जागा उपलब्ध आहे, कोठे उपचार मिळतील, कोठे ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकेची गरज भासल्यास कोणाला फोन करायचा, हॉस्पिटलच्या बिलाच्या तक्रारी यासह इतर अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता शिवसेनेशी संपर्क साधावा.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोल्हापूर शहरवासियांसाठी “माझे शहर – माझी जबाबदारी” ही हेल्पलाईन मोहिम शिवसेना कोल्हापूर शहरच्यावतीने राबविण्यात येत आहे. अत्यावश्यक रुग्णांना बेडची व्यवस्था, रुग्णवाहिका, क्वारंटाईन सेंटर, उपचार आदीबाबत सविस्तर माहिती आणि मदत या हेल्पलाईनद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
“माझे शहर-माझी जबाबदारी” हेल्पलाईन नंबर – ७०२८०३९०९९, ७०२८०४९०९९, ७०२८०६९९०९९, ७०२८०७९०९९