केएसए चषक स्पर्धेत ‘लिग चॅम्पियन’साठी आता चढाओढ!

Spread the love

• शिवाजी, दिलबहार, पीटीएम, प्रॅक्टीस व बीजीएम संघात चुरस
कोल्हापूर • प्रतिनिधी
       यंदाचा “लिग चॅम्पियन” कोण होणार, याची उत्सुकता फुटबॉलशौकिनांना लागली आहे. केएसए चषक स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर शिवाजी तरूण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांनी प्रत्येकी १० गुण मिळवून आघाडी घेतली आहे. पीटीएम (अ)ने ९ गुण मिळवले आहेत. त्यापाठोपाठ प्रॅक्टीस फुटबॉल क्लब व बीजीएम स्पोर्टसने  ७ गुणांवर मजल मारली आहे. लिग चॅम्पियनचा बहुमान पटकावण्यासाठी आता सिनियर सुपर ८ गटात चढाओढ आहे. सहाव्या आणि सातव्या फेरीतील सामन्यात कोण बाजी मारणार, यावरच यंदा कोणता संघ “लिग चॅम्पियन” होणार हे स्पष्ट होईल.
        सिनियर ८ गटात ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळने १२ गुणांची कमाई केली आहे. या गटात कमी गुण मिळालेले दोन संघ केएस‌‌‌ए कनिष्ठ ब गटात जातात, त्यामुळे कनिष्ठ गटातील गच्छंती टाळणे व संघाची कामगिरी सुधारण्यासाठी उर्वरित सामने जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
        केएसए चषक अर्थात केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत सिनियर सुपर-८ गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत “लिग चॅम्पियन”चा बहुमान पटकावण्यासाठी चढाओढ असते. सर्वाधिक गुण मिळविणारे दोन संघ गुणानुक्रमे विजेता व‌‌‌ उपविजेता ठरतो. तसेच सिनियर-८ गटात वरिष्ठ गटातील स्थान अबाधित राखण्यासाठी व कनिष्ठ गटात होणारी गच्छंती टाळण्यासाठी संघांची धडपड सुरू असते. यामुळेच लिग स्पर्धेतील सामन्यांविषयी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. एकूण सात फेऱ्यांमध्ये प्रत्येक संघाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागते, अन्यथा गटातील स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच प्रत्येक संघ सरस कामगिरी करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असतात.
      पाचव्या फेरीअखेर शिवाजी तरूण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांनी प्रत्येकी ३ सामने जिंकून एक बरोबरी व एक पराभव अशी कामगिरी करत सर्वाधिक १० गुण मिळवून आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ पीटीएम (अ) ने २ सामने जिंकून व ३ सामन्यात बरोबरीसह ९ गुणांवर मजल मारली आहे. प्रॅक्टीस क्लब आणि बीजीएम स्पोर्टसने प्रत्येकी ७ गुणांचा टप्पा गाठला आहे. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळची सर्वात खराब कामगिरी झाली असून हा संघ अवघ्या एक गुणावर आहे. बालगोपाल तालीम मंडळला विजयापासून दूरच राहावे लागत आहे. त्यांचे पाचही सामने बरोबरीत राहिल्याने गुणतक्त्यात पाच गुणांची नोंद आहे. खंडोबा तालीम मंडळ (अ) ने ४ गुण प्राप्त केले आहेत. आता उर्वरित दोन सामन्यात कोणता संघ विजयी घोडदौड कायम ठेवून सर्वाधिक गुण प्राप्त करत जेतेपदावर शिक्कामोर्तब हे पहावे लागेल.
       सिनियर-८ गटात वरिष्ठ गटातील आपले स्थान अबाधित राखण्यासाठी व कनिष्ठ गटात होणारी गच्छंती टाळण्यासाठी संघांची धडपड सुरू असते. गुणानुक्रमे सर्वात कमी गुण मिळालेले दोन संघ केएसए कनिष्ठ ब गटात जातात. या गटात ऋणमुक्तेश्वरने उत्कृष्ट कामगिरी करत चार विजयासह सर्वाधिक १२ गुण मिळवले आहेत. कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाने ९ गुणांची तर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, झुंजार क्लब आणि संयुक्त जुना बुधवार पेठने प्रत्येकी ७ गुणांवर मजल मारली आहे. पीटीएम (ब) आणि सम्राटनगर स्पोर्टसने प्रत्येकी ६ प्राप्त केले आहेत. स्पर्धा सुरु होताना गटात वरचे स्थान असलेल्या खंडोबा (ब)ची कामगिरी सुमार दर्जाची झाल्याने अवघ्या ४ गुणांवर आहे. उर्वरित सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विजय संपादन केला तरच गुण वाढून वरिष्ठ गटातील स्थान अबाधित राहील अन्यथा सर्वात कमी गुण मिळालेल्या दोन संघांना धोका पोहोचू शकतो.
             सहाव्या व सातव्या फेरीतील सामने पुढीलप्रमाणे:
• दि.१६: खंडोबा (ब) – पोलिस संघ
              प्रॅक्टीस – पीटीएम (अ)
• दि.१७: जुना बुधवार – पीटीएम (ब)
              फुलेवाडी – शिवाजी
• दि.१८: उत्तरेश्वर – झुंजार क्लब
              बालगोपाल – खंडोबा (अ)
• दि.१९: ऋणमुक्तेश्वर – सम्राटनगर स्पोर्टस
              दिलबहार – बीजीएम स्पोर्टस
• दि.००: झुंजार क्लब – सम्राटनगर स्पोर्टस
              खंडोबा (अ) – बीजीएम स्पोर्टस
• दि.००: उत्तरेश्वर – ऋणमुक्तेश्वर
              बालगोपाल – दिलबहार
• दि.००: पोलिस संघ – पीटीएम (ब)
              पीटीएम (अ) – शिवाजी
• दि.००: खंडोबा (ब) – जुना बुधवार
              प्रॅक्टीस – फुलेवाडी

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!