• कागलमध्ये बांधकाम कामगारांचा विराट मेळावा कोल्हापूर • प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारने कामगारांना उद्ध्वस्त करुन अक्षरश: देशोधडीला लावले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता कामगारांच्या लढाईसाठी कंबर कसुया, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप राजवट असलेल्या राज्य सरकारांनी कामगारांची परवड केली, असेही ते म्हणाले. कागलमध्ये आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व लाल बावटा बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे होते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, केंद्र सरकारने कामगारांच्या सुरक्षिततेचे ४४ कायदे रद्द करून चार संहिता आणल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात बांधकाम कामगार कायदा १९९६ साली मंजूर होता. परंतु आपल्या कामगार मंत्रिपदाच्या काळात या असंघटित बांधकाम कामगारांसाठी इमारत बांधकाम कामगार मंडळ स्थापन केले. आयुष्यभर गरीब माणूस डोळ्यासमोर ठेवूनच समाजकारण केले, असे सांगतानाच मंत्री मुश्रीफ म्हणाले, इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून गवंड्यासह, पाया खुदाई मजूर, दगडफोड्या, प्लंबर आदी कामगाराचे कोट कल्याण केले. सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व कामगारांचे ऋणानुबंध घट्ट आहेत. हे नातं यापुढेही असेच टिकवूया. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे कामगार खाते नसले तरी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी तळमळीने मांडतील व सोडवतील अशी अपेक्षाही श्री. कांबळे यांनी व्यक्त केली. सिटू संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम, आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार, कामगार आयुक्त संदेश अहिरे यांनीही मार्गदर्शन केले. स्वागत मोहन गिरी तर सूत्रसंचालन रामचंद्र सुतार यांनी केले. आभार विक्रम खतकर यांनी मानले. पेन्शन व मेडिक्लेमसाठी प्रयत्नशील….. मंत्री मुश्रीफ म्हणाले, नोंदीत इमारत बांधकाम कामगार साठ वर्षाचा झाल्यानंतर तो शारीरिकदृष्ट्या थकलेला असतो. बांधकामाशी संबंधित कोणतीच कामे तो करु शकणार नाही. त्यासाठी त्याच्या वृद्धापकाळात हातभार म्हणून त्याला वयाच्या साठ वर्षानंतर सेवानिवृत्ती पेन्शन मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील राहू. कामगारांच्या बंद पडलेल्या मेडिक्लेम योजना सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील राहू. यावेळी सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे, राहुल तोडकर, इंद्रजीत पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष कॉ. संदीप सुतार, भुदरगड तालुका अध्यक्ष कॉ. शिवाजीराव मोरे, तालुका सचिव राजाराम आरडे, दगडू कांबळे, राहूल निकम, उमेश चौगुले आदींसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते . ———————————————– Attachments area ![]() |