कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने जानेवारी महिन्यात उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्याचा चौकशी समितीचा पूर्ण अहवाल सुमारे दोन महिने होऊन गेल्यानंतरही मिळत नसल्यामुळे आज भाजपा कार्यकर्त्यांनी उपायुक्तांच्या केबिनमध्ये सुमारे पावणे तीन तास ठिय्या मारून बसल्यानंतर पूर्ण अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावडा येथील शेतामध्ये टाकल्या जात असलेल्या विनाप्रकिया कचरा व त्यामागील मोठा आर्थिक व्यवहार जानेवारी महिन्यात उघडकीस आणला होता. तेव्हापासून सातत्याने भाजपा या विषयाचा पाठपुरावा करत आहे. ६ जानेवारीला उघडकीस आणलेल्या या प्रकारानंतर त्याचदिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी महानगरपालिकेच्या अधिकार्यांसमवेत प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला होता आणि पालिका घनकचरा व्यवस्थापनाचे प्रभारी डॉ. विजय पाटील यांची स्वाक्षरी असलेल्या या पंचनाम्यामध्ये, सदर ठिकाणी महानगरपालिका टाकत असलेला कचरा अशास्त्रीय पद्धतीने व कोणतीही पर्यावरणाची काळजी न घेता टाकला असल्याचे आढळले. असा स्पष्ट उल्लेख होता. तरीही या विषयावरून महानगरपालिकेला केवळ नोटीस बजावण्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल १८ दिवस घेतले व त्यासाठी भाजपाला तीव आंदोलन करावे लागले. या नोटिशीला उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या स्वाक्षरीने दिल्या गेलेल्या उत्तरात महानगरपालिकेने सदर प्रकार कर्मचार्यांच्या चुकीने आणि दुर्लक्षामुळे घडल्याचे म्हटले.
या सर्व प्रकाराच्या चौकशीसाठी प्रशासकांनी नेमलेल्या चौकशी समितीलाही आपला चौकशी अहवाल प्रशासकांना सादर करण्याकरिता सुमारे दीड महिना लागला आणि या अहवालातही अत्यंत गंभीर असलेल्या या गुन्ह्याबद्दल अत्यंत जुजबी कारवाई करून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे.
वारंवार मागणी करूनही आजवर महानगरपालिकेने अहवालाची पूर्ण प्रत दिलेली नाही. यामुळे आज भाजपाचे चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील हे सकाळी अकराच्या सुमारास उपायुक्तांच्या केबिनमध्ये दाखल झाले. त्यावेळी उपायुक्त अडसूळ हे विभाग प्रमुखांच्या बैठकीत गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उपायुक्तांची संपर्क केला व जोवर अहवालाची प्रत मिळत नाही तोवर केबिन सोडणार नाही असे ठणकावले. सुमारे पावणेतीन तास कार्यकर्ते केबिनमध्ये बसून होते शेवटी बैठक संपल्यानंतर उपायुक्तांनी केबिनला येऊन स्वतः या अहवालाची पूर्ण प्रत कार्यकर्त्यांच्याकडे सोपविली. यावेळी माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम हे उपस्थित होते.
——————————————————-